Nepal Protest: नेपाळमध्ये जेन-झेड आंदोलकांमध्ये फूट, आपसात तुंबळ हाणामारी; कारण काय जाणून घ्या..

Nepal Protest: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाहीये. अंतरिम पंतप्रधानाच्या नावावरून जेन-झेड आंदोलक दोन गटांत विभागले गेले असून, गुरुवारी (११ सप्टेंबर) लष्कर मुख्यालयाबाहेर या गटांमध्ये हाणामारी झाली. यात अनेक तरुण जखमी झाले. आंदोलकांमध्ये अंतरिम पंतप्रधानाच्या नावावर एकमत होत नसल्याने तणाव वाढला आहे.
आंदोलकांमध्ये फूट आणि हाणामारी
नेपाळी माध्यमांनुसार, काठमांडूमधील लष्कर मुख्यालयाबाहेर अंतरिम पंतप्रधानाच्या उमेदवाराच्या नावावरून तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. काही तरुण काठमांडूचे महापौर आणि रॅपर बालेन शाह, माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की किंवा इंजिनीअर कुलमान घीसिंग यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याची मागणी करत आहेत. मात्र, बालेन शाह आणि सुशीला कार्की यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिल्याने कुलमान घीसिंग यांचे नाव आघाडीवर आहे. ९ सप्टेंबरला बालेन शाह, १० सप्टेंबरला सुशीला कार्की आणि ११ सप्टेंबरला कुलमान घीसिंग यांचे नाव चर्चेत होते.
आंदोलनाची पार्श्वभूमी –
नेपाळमधील जेन-झेड आंदोलकांनी ज्येष्ठ नेत्यांच्या कारभाराला कंटाळून संसद भंग करण्याची मागणी केली आहे. जीन्स-झेड नेते अनिल बनिया आणि दिवाकर दंगल यांनी सांगितले की, “हा आंदोलनाचा उद्देश संविधान बदलणे नसून, संसद भंग करणे आहे.” दोन दिवसांपूर्वी झालेल्या तख्तापलटानंतर आंदोलक आणि लष्कर यांच्यात तणाव वाढला आहे. सध्या जीन्स-झेड प्रतिनिधी, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि लष्करप्रमुख यांच्यात चर्चा सुरू आहे.
लष्कर मुख्यालयाबाहेर आंदोलकांमध्ये झालेल्या हाणामारीने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. नेते आणि वैद्यकीय व्यावसायिक दुर्गा प्रसाई यांना लष्कराने चर्चेसाठी बोलावले. यामुळे आंदोलकांचा संताप आणखी भडकला. लष्कर आपला उमेदवार पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका आंदोलकांना आहे. यामुळे लष्कराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अंतरिम पंतप्रधानाच्या नावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. जीन्स-झेड आंदोलकांमधील मतभेद आणि लष्कराच्या कथित हस्तक्षेपामुळे नेपाळमधील राजकीय परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे. काठमांडूमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून, आंदोलनाची दिशा लष्कर आणि आंदोलकांमधील चर्चेवर अवलंबून आहे.





