‘नेपाळसारखी परिस्थिती कोणत्याही देशात होऊ शकते, सावध रहा’; ठाकरे गटाचे सूचक विधान

Nepal Protest | भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये सत्तेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणांच्या आंदोलनाने राजकीय भूकंप घडवून आणला आहे. सोमवारी सुरू झालेल्या जेन-झेड आंदोलनाने मंगळवारी हिंसक रूप धारण केले, ज्यात १९ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयाने भडकलेल्या या आंदोलनाने पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी नेपाळमधील अराजकतेवर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. ”Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांना मेन्शन केलं आहे. तसेच, एका युवकाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आपल्या हक्कांसाठी जागा झालेला युवक असा दिसतो, असे म्हणत संजय राऊतांनी केंद्रातील भाजपला लक्ष्य केलं आहे.
ये हादसा किसी भी देश मे हो सकता है!
सावधान रहिये!
भारत माता की जय!
वंदे मातरम्!@BJP4India @nsitharaman @narendramodi https://t.co/aKNJL13QKf— Sanjay Raut (@rautsanjay61) September 9, 2025
या आंदोलनानंतर नेपाळमधील मंत्र्यांनी देश सोडायला सुरूवात केली. तर पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, नेपाळमध्ये बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. बालेन शाह एक रॅपर, महापौर आहेत. रॅपच्या माध्यमातून त्यांनी नेपाळमधील भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न आणि राजकीय वास्तव यावर भाष्य केलं.
बालेन शाह यांचा राजकीय प्रवास
2021 मध्ये त्यांनी काठमांडूच्या महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. 26 मे 2022 रोजी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांनी विजय मिळवला. त्यांनी नेपाळी काँग्रेस आणि CPN (UML) यांसारख्या मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. 30 मे 2022 रोजी त्यांनी महापौरपदाची शपथ घेतली. काठमांडूचे पहिले स्वतंत्र महापौर म्हणून त्यांचा इतिहासात समावेश झाला. दरम्यान, तरुणांच्या या आंदोलनाने नेपाळच्या राजकारणात नव्या वळणाची सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रपती पौडेल यांनी जेन-झेड नेत्यांसोबत चर्चेसाठी आमंत्रण दिले असून, शांततेची अपील केली आहे. सैन्यानेही संयम बाळगण्याचे आवाहन केले. भारताने आपल्या नागरिकांना नेपाळात प्रवास टाळण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा:
Shirur News : उरळगावात तहसिलदारांनी शेतकऱ्यांना दिलेला रस्ता नांगरला





