Nepal Floods : नेपाळमध्ये अतिवृष्टीचे तब्बल ‘इतके’ बळी; मदत-बचावकार्य वेगाने सुरू

Nepal Floods – अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि पुरामुळे मरण पावणाऱ्यांचीसंख्या आता २०० पर्यंत पोचली आहे. तर ३० जण अजूनह बेपत्ता आहेत. शोध आणि बचाव कार्य सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागातल्या नद्यांना पूर आले आहेत आणि दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
यामुळे संपूर्ण नेपाळमध्ये सार्वजनिक जनजीवन जवळपास ठप्प झाले आहे. अतिवृष्टी, पूर, दरडी कोसळणे आणि पाण्यात बुडण्यामुळे आतापर्यंत १९२ जणांचा मृत्यू झाला आहे, असे ग-हमंत्रालयाचे प्रवक्ते ऋषिराम तिवारी यांनी सांगितले. देशभरात अन्य १९४ जण देखील जखमी झाले आहेत. तर ३० जण बेपत्ता झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रभारी पंतप्रधान प्रकाश मान सिंह यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मदत आणि बचाव कार्य वाढवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. सर्व सुरक्षा दलांना मदत आणि बचावकार्याच्या कामासाठी जोडून घेण्यात आले आहे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
नेपाळ लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या ४,५०० जणांची आतापर्यंत सुखरुप सुटका केली आहे. अतिवृष्टीमध्ये जखमी झालेल्यांवर सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत. अन्न आणि अन्य आपत्कालिन वस्तू पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पूरामुळे हजारो लोकांना अन्न आणि पिण्याचे पाणी मिळत नाही आहे.
याशिवाय राजधानी काठमांडूमध्ये स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. महामार्गांवर दरडी कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भारतातून आणि अन्य ठिकाणावरून येणाऱ्या भाजीपाल्याची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
परिणामी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. देशभरातील डझनभर महामार्गांचे मोठे नुकसान झाले आहे. राजधानी काठमांडूकडे जाणारे बहुतेक रस्ते अजूनही बंद आहेत. त्यामुळे हजारो प्रवासी खोळंबले आहेत. महामार्गांवरील अडथले हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
उर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान
नेपाळमधील किमान २० जलविद्युत प्रकल्पांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ११०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात असते. यामुळे काठमांडू आणि अन्य मोठ्या शहरांमधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. काठमांडूतील मुख्य नदी बागमती धोक्याच्या खुणेवरून वाहते आहे. पूर्व आणि मध्य नेपाळमधील बहुतेक नद्यांना पूर आला आहे.





