Nepal Floods : नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा 359 वर; शेकडो बेपत्ता, भोटेकोशी नदीला पुन्हा महापुराचा धोका
Nepal Floods : नेपाळमधील भीषण पुरात मृतांचा आकडा ३५९ वर पोहोचला आहे. शेकडो बेपत्ता असून भोटेकोशी नदीतील तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Nepal Floods : नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा ३५३ वर पोहोचला असून ताज्या माहितीनुसार तो ३५९ पर्यंत वाढला आहे. शेकडो जण अद्याप बेपत्ता आहेत. विविध यंत्रणांच्या आकडेवारीनुसार बेपत्तांची संख्या वेगवेगळी असून ८०० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते.
दरम्यान, भोटेकोशी नदी परिसरात पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. उपग्रह छायाचित्रांमध्ये पूरग्रस्त ठिकाणी तलाव तयार झाल्याचे दिसून आले आहे. हा तलाव वेगाने वाढत असून फुटण्याची शक्यता असल्याने नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने नागरिक आणि बचाव पथकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीमागे हिमनदीचा मोठा भाग कोसळणे आणि त्यानंतर निर्माण झालेला मलब्याचा प्रवाह कारणीभूत ठरला. सुरुवातीला भूकंपामुळे हिमस्खलन होऊन पूर आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, USGS ने सुरुवातीला भूकंपासारखी वाटलेली हालचाल प्रत्यक्षात हिमनदी कोसळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले.
या आपत्तीत नेपाळमध्ये ८२६ जण बेपत्ता असल्याचे यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितले होते, तर तिबेटमध्ये ५५८ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली. नेपाळ पर्यटन मंडळाने गुरुवारी ६६७ जण बेपत्ता असल्याचे सांगितले असून त्यात ११ भारतीयांचा समावेश आहे. विविध देशांतील नागरिकही बेपत्ता असून भारत, चीन, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, रशिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोर्तुगाल, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युक्रेन, इस्रायल यांसह ३० हून अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे.
नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खानाल यांनी यापूर्वी जवळपास ३०० भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याचे सांगितले होते. मात्र, पर्यटन मंडळाच्या ताज्या माहितीनुसार ही संख्या १७८ वर आली होती. दरम्यान, रॉयटर्सच्या माहितीनुसार सुमारे १०० बेपत्ता भारतीय नागरिकांचा शोध लागला आहे.
भारताने मदतीचा हात पुढे करत नेपाळला १० टन मानवतावादी आणि आपत्ती निवारण साहित्य (HADR) तसेच आवश्यक औषधे पाठवली आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. अमेरिकेनेही नेपाळला ५ लाख डॉलरची आपत्कालीन मदत देण्याची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही सतर्कता
नेपाळमधील पुराचा परिणाम भारतातील सीमावर्ती भागांवर होण्याची शक्यता असल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. गंडक नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. NDRF आणि स्थानिक बचाव पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात गुरुवारी गंडक नदीतून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. SSBच्या पथकाला नदीच्या वेगवान प्रवाहात मृतदेह वाहून जाताना दिसल्यानंतर मोटारबोटीच्या मदतीने ते बाहेर काढण्यात आले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. हे मृतदेह नेपाळमधून वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बचावकार्याला मोठे आव्हान
पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते, इमारती आणि अनेक भागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या खालच्या मजल्यांमध्ये चिखल आणि गाळ साचला असून बचाव पथके ढिगाऱ्यांमध्ये अडकलेल्यांचा शोध घेत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून थर्मल आणि ऑप्टिकल कॅमेऱ्यांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, आपत्तीची व्याप्ती इतकी मोठी आहे की सध्याची सरकारी बचाव यंत्रणा त्यासाठी अपुरी ठरत आहे. बाधित कुटुंबांना अन्न, निवारा आणि मदत पोहोचवताना मोठ्या अडचणी येत आहेत.
नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी गुरुवारी पूरग्रस्त नुवाकोट जिल्ह्याला भेट देऊन बचाव आणि शोधमोहीमेचा आढावा घेतला. नुवाकोटमधील देविघाट परिसराला मोठा फटका बसला असून रस्ते आणि इमारतींचे नुकसान झाले आहे.
गुजरातमधील १२ जण बेपत्ता असल्याची माहिती आधी मिळाली होती. त्यापैकी वलसाड येथील रोमा दिलीपभाई इंटवाला यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्या सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुजरातमधील बेपत्तांची संख्या ११ झाली आहे.
नेपाळमधील ही आपत्ती अलीकडच्या काळातील देशातील सर्वात भीषण नैसर्गिक संकटांपैकी एक ठरली आहे.





