nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

nepal-china – नेपाळमध्ये सुरू असलेल्या संततधारपावसामुळे आलेल्या पुरामुळे नेपाळ आणि चीनला जोडणारा फ्रेंडशीप ब्रीज वाहून गेला आहे. नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला.
राजधानी काठमांडूच्या इशान्येला १२० किलोमीटर अंतरावर रासुवा जिल्हयात हा पूल होता. नदीला आलेल्या पुरात एका चिनी व्यक्तीबरोबर एकूण १८ जण वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह ११ जणांना वाचवले, असे राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करणे आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.
या पुरामुळे मोठे नुकसान झाले झाल्याचे रासुवा जिल्ह्याचे मुख्य जिल्हा अधिकारी अर्जुन पौडेल यांनी सांगितले. प्रशासनाने नदीच्या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आहे. पुरामध्ये काही घरे आणि चीनमधून आयात केलेली ५ इलेक्ट्रिक वाहने देखील वाहून गेली आहेत.
दरम्यान, मंगळवारी सकाळी धाडिंग जिल्ह्यातील गजुरी ग्रामीण नगरपालिकेतील त्रिशुली नदीतून पोलिसांना दोन मृतदेह आढळले. त्यांची ओळख अद्याप पटवली जा शकलेली नाही. नेपाळ लष्कराच्या बचाव पथकाने २३ कामगारांनाही वाचवले आहे. यात एका चिनी नागरिकाचा समावेश आहे.
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे रसुवागढी जलविद्युत प्रकल्पातील काही भाग पाण्याखाली गेल्याने काही लोक तेथे अडकले होते. पुरामुळे या जलविद्युत प्रकल्पाचेही अंशतः नुकसान झाले आहे, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.





