Pimpri News: ना गळती रोखता आली, ना समान वितरण! दिवसाआड पाणीपुरवठ्याची सात वर्षे
कोट्यवधींचा खर्च करूनही नागरिकांच्या पदरी टँकरच

पिंपरी – पाणी येण्याच्या दिवशी टाक्या, ड्रम भरून ठेवायचे… दुसऱ्या दिवसासाठी पाणी जपून वापरायचे… साठा कमी पडला तर टँकर मागवायचा… पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली ही पाण्याची कसरत सुरू होऊन सात वर्षे झाली.
मात्र, या सात वर्षांत ना पाणीगळती रोखण्यात महापालिकेला ठोस यश आले, ना सर्व भागांत समान पाणीपुरवठा करता आला. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय नेमका कोणत्या उद्देशाने घेतला आणि सात वर्षांनंतर त्यातून काय साध्य झाले, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. त्या वेळी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, वितरणातील असमतोल दूर करणे आणि सर्व भागांना पुरेसे पाणी देणे, हा त्यामागील उद्देश होता.
मात्र, सात वर्षांनंतरही ही व्यवस्था कायम आहे. उलट कमी दाबाने पाणी येणे, अपुरा पुरवठा आणि काही भागांत टँकरवर अवलंबून राहावे लागणे, अशा तक्रारी कायम आहेत. त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाचा मूळ उद्देश प्रत्यक्षात कितपत साध्य झाला? असा प्रश्न शहरवासिय उपस्थित करत आहेत.
विशेषतः वाकड, पुनावळे, रावेत, चिखली आणि मोशी परिसरातील अनेक सोसायट्यांना उन्हाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागतो. नळाला पाणी आले तरी आवश्यक साठा होत नाही. परिणामी सोसायट्यांच्या व्यवस्थापन समित्यांना टँकरचे नियोजन करावे लागते.
त्यासाठी रहिवाशांकडून अतिरिक्त पैसे गोळा केले जातात. म्हणजेच महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी कर भरणाऱ्या नागरिकांना त्याच पाण्यासाठी पुन्हा टँकरचा खर्च करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यानंतरही वितरणातील त्रुटी दूर झाल्या का, जलवाहिन्यांमधील गळती किती कमी झाली, कोणत्या भागात किती पाणी पोहचते आणि प्रत्यक्षात किती पाणी वाया जाते, याबाबत ठोस आकडेवारी नागरिकांसमोर आलेली नाही.
पाणीपुरवठा सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जात असताना नागरिकांना मात्र पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करावे लागत आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या जोडीला १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
नोव्हेंबरमधील माहितीनुसार पवना, आंद्रा आणि एमआयडीसीकडून मिळून शहराला प्रतिदिन ६३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असतानाही शहरातील अनेक भागांत अपुऱ्या पुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत.
त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन, वितरणातील तफावत आणि गळती या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ पाणीकपातीचा पर्याय किती दिवस वापरणार, असा प्रश्न आहे.
सात वर्षांत खर्चाचा डोंगर
महापालिकेच्या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहता पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे. २०२२-२३ मध्ये पाणीपुरवठा विभागाचा प्रत्यक्ष भांडवली खर्च २५६ कोटी ४८ लाख रुपये, तर महसुली खर्च ३१० कोटी ४८ लाख रुपये होता. म्हणजेच दोन्ही मिळून सुमारे ५६६ कोटी ९६ लाख रुपये खर्च झाले. २०२४-२५ मध्ये भांडवली कामांसाठी २६९ कोटी ९० लाख रुपयांची मूळ तरतूद करण्यात आली होती.
२०२५-२६ मध्ये पायाभूत सुविधांसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र, या खर्चातून नेमक्या कोणत्या भागातील पाणीपुरवठा सुधारला? किती किलोमीटर जलवाहिन्या बदलल्या? गळती किती कमी झाली? पाण्याचा दाब सुधारण्यासाठी कोणती कामे झाली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोज पाणीपुरवठ्याच्या दिशेने किती प्रगती झाली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
टँकरच्या २४ हजारांहून अधिक खेपा!
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नोंदीनुसार, १ जानेवारी ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शहरात टँकरच्या एकूण २४ हजार २२५ खेपा झाल्या. त्यापैकी ११ हजार ७४७ खेपा महापालिकेच्या, तर १२ हजार ४७८ खेपा खासगी टँकरच्या होत्या. म्हणजेच खासगी टँकरच्या खेपांची संख्या महापालिकेच्या टँकरपेक्षा अधिक आहे.
हा आकडा शहरातील पाणीपुरवठ्याच्या वास्तवावर प्रकाश टाकणारा आहे. खासगी टँकरच्या सर्वाधिक ३ हजार २५५ खेपा ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झाल्या. त्याखालोखाल ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात ३ हजार १००, तर ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २ हजार ५४७ खेपा झाल्या. खासगी टँकरच्या वाढत्या खेपांमुळे नागरिकांवर पडणारा आर्थिक भारही लक्षात घेण्याची गरज आहे.
बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प पंधरा वर्षांपासून रखडला
पवना धरणातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाणी आणण्यासाठी प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची रखडपट्टी हा महापालिकेच्या पाणी नियोजनातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
सुमारे पंधरा वर्षांपासून हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अंतिम तोडगा काढल्यानंतर काम सुरू करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र, प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि प्रकल्प कधी पूर्ण होणार हा प्रश्न कायम आहे.
भामा-आसखेडचे पाणी मिळाल्यानंतरही प्रश्न कायम?
भामा-आसखेड धरणातून प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर पाणी शहराला उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. जानेवारी २०२७ अखेर शहराला पाणी मिळेल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
मात्र, पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार फेब्रुवारीमध्ये चाचणी आणि मार्चमध्ये प्रत्यक्ष पुरवठ्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. वाढीव पाणी उपलब्ध झाल्यानंतरही वितरण व्यवस्था सक्षम नसेल, जलवाहिन्यांमधील गळती कायम असेल आणि काही भागांत कमी दाबाने पाणी मिळत असेल, तर केवळ पाण्याचे स्रोत वाढवून प्रश्न सुटणार नाही. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि समान वितरण यासाठी स्वतंत्र कृती आराखडा आवश्यक आहे.





