‘नेहरूंना दोन मतं, तरीही पंतप्रधान’ – नेहरू-गांधी कुटुंबाने तीन वेळा ‘व्होट चोरी’ केली: अमित शाहांचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत निवडणूक सुधारणा प्रक्रियेवरील चर्चेला उत्तर देताना त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘व्होट चोरी’ म्हणजे काय, याचे प्रकार स्पष्ट करत अमित शाह यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर तीन वेळा ‘व्होट चोरी’ केल्याचा गंभीर आरोप केला.
अमित शाह यांनी ‘व्होट चोरी’चे तीन प्रकार सांगितले: मतदार नसताना मतदान करणे, चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकणे, आणि जनादेश बाजूला ठेवून पद ग्रहण करणे.
स्वातंत्र्यानंतरची पहिली ‘व्होट चोरी’ –
शाह म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान निवडायचा होता. त्यावेळी काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांनी मतदान केले. सरदार पटेल यांना २८ मतं मिळाली, तर जवाहरलाल नेहरूंना फक्त दोन मतं मिळाली. तरीही पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. ही पहिली ‘व्होट चोरी’ होती.”
लोकसभा में चुनाव सुधारों पर आयोजित चर्चा से लाइव…
Speaking in the Lok Sabha on election reforms. https://t.co/YcV3of7Q6M
— Amit Shah (@AmitShah) December 10, 2025
इंदिरा गांधींच्या काळात दुसरी ‘व्होट चोरी’ –
दुसऱ्या प्रसंगात शाह यांनी इंदिरा गांधींच्या रायबरेली निवडणुकीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “इंदिरा गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक जिंकली. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणुकीत अनियमितता झाल्याचे मान्य करत त्यांच्या विरोधात निकाल दिला. हीदेखील एक मोठी व्होट चोरी होती.” या ‘व्होट चोरी’वर पांघरूण घालण्यासाठी नंतर संसदेत कायदा आणला गेला की, पंतप्रधानांवर कोणताही खटला दाखल होऊ शकत नाही, यावर राहुल गांधींचे काय मत आहे, असा सवालही शाह यांनी उपस्थित केला.
सोनिया गांधींच्या काळात तिसरी ‘व्होट चोरी’-
तिसऱ्या प्रसंगात अमित शाह यांनी सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. “योग्यता नसतानाही मतदार झाल्याचा प्रकार त्यांच्या काळात झाला. सोनिया गांधी देशाच्या नागरिक होण्यापूर्वीच मतदार बनल्या होत्या,” असे ते म्हणाले. हा वाद सध्या दिल्ली न्यायालयात पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभेत विशेष सधन पुनरीक्षण (SIR) या विषयावर बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रोखून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कथित ‘मत चोरी’च्या आरोपांवर थेट वादविवाद करण्याचे आव्हान दिले होते. यानंतर संसदेत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि वातावरण चांगलेच तापले.





