Rohit Sharma Transformation : “रोहित, मी तुला ओळखूच शकले नाही!” फिट ‘हिटमॅन’ला पाहून नीता अंबानी चकित; पाहा VIDEO
Rohit Sharma Transformation : रोहित शर्मा याच्या 'न्यू लूक'ने केवळ चाहत्यांनाच नव्हे, तर खुद्द संघ मालकीण नीता अंबानी यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Neeta Ambani Praises Rohit Sharma Transformation : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी सज्ज असलेल्या मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी खेळाडूंची आणि स्टाफची भेट घेतली. यावेळी जेव्हा त्यांची भेट रोहित शर्माशी झाली, तेव्हा रोहितचा कमालीचा फिटनेस पाहून त्या थक्क झाल्या.
‘तू तर खूपच तरुण दिसतोयस’ –
मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नीता अंबानी रोहितला पाहून म्हणाल्या, “रोहित, मी तुला ओळखूच शकले नाही! तू आधीपेक्षा खूपच तरुण (Young) दिसत आहेस.” नीता अंबानींकडून ही दाद मिळाल्यानंतर रोहितच्या चेहऱ्यावर हसू उमलले. यावेळी नीता अंबानी यांनी किरॉन पोलार्डचीही भेट घेतली आणि आपल्या कुटुंबातील एका सदस्याची ओळख करून देताना पोलार्डचा उल्लेख ‘पोली काका’ असा केला.
Mrs. Nita Ambani met the squad during training ahead of the start of TATA IPL 2026! 💙 pic.twitter.com/r2Gy9NaDOc
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2026
महेला जयवर्धनेकडून कौतुकाचा वर्षाव –
रोहित शर्माने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो आता फक्त वनडे खेळतो. मात्र, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्याने गेल्या काही महिन्यांत प्रचंड मेहनत घेतली आहे. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहितच्या या समर्पणाचे कौतुक केले. “रोहित सराव शिबिराच्या पहिल्या दिवसापासूनच आमच्यासोबत आहे. त्याने आपल्या कौशल्यावर आणि फिटनेसवर खूप काम केले आहे. नेटमध्ये तो कमालीच्या लयमध्ये दिसत असून, या हंगामात तो त्याच्या बॅटने नेतृत्व करेल,” असे जयवर्धने यांनी ‘एमआय ज्युनिअर २०२६’ च्या फायनल दरम्यान सांगितले.
रोहित शर्मा आता केवळ एक फलंदाज म्हणून मैदानात उतरणार असला, तरी त्याचा अनुभव आणि हा ‘नवा अवतार’ मुंबई इंडियन्ससाठी निर्णायक ठरू शकतो.





