नीट घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगुलवार निलंबित; प्रशासनाने केली मोठी कारवाई

धाराशिव : देशपातळीवर गाजत असणाऱ्या नीट परीक्षेच्या घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगुलवारवर प्रशासनाने कारवाई केली आहे. काेनगुलवार याला आरटीआय प्रशासनाकडून निलंबित करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआर येथे निदेशक पदावर कोनगुलवार कार्यरत होते. इरण्णा याच्यावर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पेपरफूटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोनगुलवार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी देशभर गदारोळ माजला असून या गैरव्यवहाराचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्येही सापडले आहेत. नीटमध्ये गुण वाढवून देण्यासाठी दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्कात असाणारा उमरगा आयटीआरमधील नोकरी करणाऱ्या इरण्णा कोनगुलवार या आरोपीवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवत होता अशी माहिती देण्यात आली होती.
नीट गैरव्यवहार प्रकरणात लातूर येथे चार लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. तर आरोपी इराण्णा कोनगलवार हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.





