पुढील आदेशापर्यंत नीट युजी काऊन्सिलिंग स्थगित: एनटीएचा निर्णय

नवी दिल्ली : मेडिकल काऊन्सिलिंग कमिटी अर्थात एमसीसीकडून नीट-यूजी परीक्षेसाठी काऊन्सिलिंग प्रक्रिया शनिवार, 6 जुलैपासून सुरू होणार होती. मात्र, त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असल्याने, हे काऊन्सिलिंग पुढे ढकलण्यात आले असावे, असा अंदाज आहे. काऊन्सिलिंगसाठी नवीन तारखांची घोषणा लवकरच केली जाईल.
नीट युजी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी काऊन्सिलिंगला 6 जुलैपासून सुरू होणार होती. मात्र, नेशनल टेस्टिंग एजेंसी अर्थात एनटीएने याला स्थगिती दिली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हे काऊन्सिलिंग स्थगित करण्यास नकार दिला होता. मात्र, एमसीसीकडून यासंदर्भात कोणतेही वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. दरम्यान, 8 जुलै रोजी नीट प्रकरणाशी संबंधित अन्य प्रकरणांवर सुनावणी होणार असल्याने हे काऊन्सिलिंग दोन दिवसांसाठी थांबवण्यात यावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.
एमसीसीकडून लवकरच नीट यूजी काऊन्सिलिंगच्या नवीन तारखांची घोषणा केली जाईल. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर या तारखांची घोषणा होण्याचा अंदाज आहे. एमसीसीकडून काऊन्सिलिंगच्या माध्यमातून मेडिकल, डेंटल आणि आयुष पदवी अभ्यासक्रमात (MBBS, BDS, BHMS, BAMS, BYMS, BUMS) अखिल भारतीय कोट्या अंतर्गत (AIQ) 15% जागांवर आणि दिल्ली विश्वविद्यालय (डीयू), बीएचयू और एएमयूसह अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठात प्रवेश दिला जाईल.
‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार
नीट युजी काऊन्सिलिंगमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. यासाठी उमेदवारांनी दहावी, बारावी मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट, डोमिसाईल, आवश्यकता असल्यास जात प्रमाणपत्र आदी तयार ठेवावीत. तुमच्याकडे यापैकी कागदपत्रे नसतील तर आताच तयारी करून ठेवा. म्हणजे आयत्या वेळी गडबड होणार नाही.





