NEET: NEET-UG 2026 परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांनंतर रद्द झाल्याने मानसिक तणावात असलेल्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे गुरुवारी घडली. रितिक मिश्रा असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. गंगोत्रीनगर परिसरातील घरात रितिकने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. ही त्याची NEET ची तिसरी प्रयत्न परीक्षा होती. यंदा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा त्याला पूर्ण विश्वास होता. मात्र पेपरफुटीच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर तो प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. रितिक हा इसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनपूर कटौली गावचा रहिवासी होता. कुटुंबाचे लखीमपूर शहरातील गंगोत्रीनगर येथेही घर आहे. बुधवारी तो गावाहून शहरात आला होता. परीक्षा रद्द झाल्यानंतर तो निराश आणि अस्वस्थ दिसत होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. “रितिकवर प्रचंड मानसिक दबाव होता. ही त्याची तिसरी संधी होती आणि यावेळी तो यशस्वी होईल, असा त्याला विश्वास होता. परीक्षा रद्द झाल्याने तो पूर्णपणे खचून गेला,” असे त्याचे वडील अनूप मिश्रा यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. लखीमपूर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश कुमार सिंह यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. NEET (UG) 2026 परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती. मात्र पेपरफुटीच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने मंगळवारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.