Neena Gupta: ‘मग मी त्याला हाकलून दिलं…’; सगळी तयारी झाली होती, पण ऐनवेळी होणाऱ्या नवऱ्याकडून नीना गुप्ता यांना धोका

Neena Gupta: ‘पंचायत’ आणि ‘बधाई दो’सारख्या चित्रपट-वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता ने आपल्या आयुष्यातील एक फारसा कुणाला माहीत नसलेला प्रसंग उघड केला आहे. एकदा त्या लग्नासाठी पूर्णपणे तयार होत्या, सगळी तयारीही झाली होती. मात्र, अखेरच्या क्षणी होणाऱ्या नवऱ्याने त्यांना धोका दिला, असे त्यांनी सांगितले.
लग्न ठरले होते, तयारीही पूर्ण
अलीकडेच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्तांनी हा अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितले की, त्या एका व्यक्तीशी साखरपुडा करून लग्न करणार होत्या. घरात लग्नाची तयारी सुरू होती आणि त्यांचे आयुष्य कसे असेल, याचाही त्यांनी विचार करून ठेवला होता.
नीना गुप्ता म्हणाल्या, “माझ्या डोक्यात सगळं ठरलं होतं. मला एक मूल होईल, संसार असेल. मी दिल्लीला कपडे आणि दागिने खरेदीसाठी गेले होते. तेवढ्यात त्याचा फोन आला आणि त्याने सांगितले की तो आत्ता लग्न करू शकत नाही.”
कारण ऐकून बसला धक्का
नीनांनी त्याला कारण विचारले असता, त्याने ‘मला सायनसचं ऑपरेशन करायचं आहे’ असं उत्तर दिलं. नीना गुप्तांना हे कारण फारसं पटले नाही, कारण त्यांना वाटलं की सायनसचं ऑपरेशन लग्नानंतरही होऊ शकतं. आजपर्यंत नातं का तुटलं, याचं खरं कारण त्यांना कळू शकलं नाही. त्यांनी त्या व्यक्तीच्या आई-वडिलांनाही विचारलं, पण कुणाकडूनही स्पष्ट उत्तर मिळालं नाही.
सहा महिन्यांनी परत आला, पण…
नीना गुप्ता यांनी पुढे सांगितले की, सहा महिन्यांनंतर तोच व्यक्ती पुन्हा त्यांच्या आयुष्यात परत आला आणि लग्नासाठी तयार असल्याचं म्हणाला. मात्र, तेव्हा नीना गुप्तांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला.
“मी त्याला थेट सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही,” असं नीना म्हणाल्या. त्यांनी त्या वेळीही त्याच्याकडून खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच सांगितलं नाही. लोक कधी कोणत्या परिस्थितीतून जात असतात, हे बाहेरच्यांना कळत नाही, असंही त्या म्हणाल्या.
त्यानंतर विवियन रिचर्ड्ससोबत नातं
या साखरपुड्यानंतर नीना गुप्ता क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या प्रेमात पडल्या. त्या लग्नाआधीच गरोदर राहिल्या आणि त्यांनी मसाबा गुप्ता या मुलीला जन्म दिला. सिंगल मदर म्हणून त्यांनी मसाबाचं संगोपन केलं. नंतर २००८ मध्ये नीना गुप्तांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.
वर्कफ्रंट
कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, नीना गुप्ता सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘वध २’ मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून, यात त्यांच्या समोर संजय मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.





