Junnar : डॅमेज मालासाठी स्वतंत्र नियमावलीची गरज
Junnar : पुणे झोन कंज्यूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशनच्या वतीने आयोजित झोन अधिवेशनात पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील वितरक व्यापार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जुन्नर : राज्यभरातील होलसेल वितरकांना विविध कंपन्यांकडून पुरवठा करण्यात येणार्या मालापैकी डॅमेज झालेल्या मालाबाबत काही कंपन्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. 90 दिवसांनंतर डॅमेज माल स्वीकारला जाणार नाही, अशी भूमिका काही कंपन्यांकडून घेतली जात असल्याने वितरकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. डॅमेज मालाबाबत स्वतंत्र नियमावली तयार करण्याची गरज असून, यासाठी ऑल इंडिया कंज्यूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
पुणे झोन कंज्यूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशनच्या वतीने आयोजित झोन अधिवेशनात पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील वितरक व्यापार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे पुणे सहआयुक्त दिगंबर भोगावडे, असोसिएशनचे सचिव प्रफुल्ल जैन, अजित लुणावत, मधुकर गायकवाड, संतोष गवारे, प्रवीण साखला, विश्वास भोईटे, संतोष लोढा, कन्हैया राजपाल, सुनील शिंदे, संदीप शहा, प्रशांत शिंदे, मुकुंद माळी, सतीश जैन आदींसह तीन जिल्ह्यांतील वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वितरकांच्या व्यवसायवाढीसाठी आवश्यक असलेल्या ‘डिस्ट्रीब्युटर अॅप’चे यावेळी अनावरण करण्यात आले. या भ्रमणध्वनी अनुप्रयोगाचा सर्व वितरकांनी नियमितपणे वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक वितरकाने खाद्य सुरक्षा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे, असे धैर्यशील पाटील यांनी सांगितले. वितरक अन्नसुरक्षा कायद्याचे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करीत असतात. मात्र, कायद्याचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी शासनाची असून, ती वितरकांची जबाबदारी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. व्यवसाय करताना दैनंदिन खर्चावर काही प्रमाणात स्वतःहून निर्बंध घालणे आवश्यक आहे. मोठ्या कंपन्यांनी लहान कंपन्यांना आणि वितरकांनी परस्परांना साथ देणे गरजेचे असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
मधुकर गायकवाड यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. भारतातील सुमारे एक कोटी 40 लाख दुकानदारांना विविध कंपन्यांचे वितरक नियमितपणे सेवा देत असून, या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम असोसिएशनच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
काळानुरूप बदल स्वीकारणे ही प्रत्येक वितरकाची गरज आहे. अन्नपुरवठा साखळीमध्ये वितरक हा महत्त्वाचा घटक आहे. व्यवसाय करताना कायदेशीर तरतुदींचे पालन केल्यास वितरकांमध्ये कारवाईची भीती राहणार नाही. प्रत्येक वितरकाकडे वैध अन्न परवाना असणे बंधनकारक असून, तो परवाना व्यवसायाच्या ठिकाणी सर्वांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे.
अन्नसुरक्षा अधिकारी तपासणीसाठी आल्यानंतर त्यांना आवश्यक कागदपत्रे दाखविणे गरजेचे आहे. मुदत संपलेला कोणताही माल व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू नये. तपासणीदरम्यान मुदत संपलेला माल आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच मुदत संपलेला किंवा कमी दर्जाचा माल विक्रीस ठेवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.





