Satara | महाबळेश्वरच्या केटस पॉईंटवर उंच संरक्षक कठड्यांची गरज

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – पर्यटन महाबळेश्वरला अनेक पर्यटक भेटी देत असतात. येथील मनोहरी निसर्गरम्य केट्स पॉइंटवर पर्यटक तासनतास निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी रेंगाळत असतात. मात्र याच पॉईंटवर फोटोसेशनचा मोह न आवरल्याने यापूर्वी पॉईंटवर पर्यटकांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. या पॉईंटवर संरक्षक कठडे उंच नसल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. सुस्त वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
महाबळेश्वर येथील हा केट्स पॉईंट पर्यटकांना आकर्षित करणारा पॉईंट म्हणून ओळखला जातो. या पॉईंटवरून धोम धरणाचा जलाशय व बॅकवॉटर त्याचबरोबर सह्याद्रीच्या रांगांचे अनोखे दर्शन व निसर्गाचे विविध रंग या पॉईंटवरून पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटक या पॉईंटवर सायंकाळी उशिरपर्यंत तासनतास रेंगाळत राहतात. मात्र पर्यटकांच्या दृष्टीने या पॉईंटवर वन विभागाकडून कोणत्याही सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाहीत.
फोटोसेशनसाठी जीव धाेक्यात
पॉईंटवरील संरक्षक कठडे हे उंचीने कमी असल्याने या कठड्यांवर उभे राहून पर्यटक फोटोसेशन करतात. यामध्ये काही दुर्घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी संरक्षक कठडे उंच करावेत, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे. मात्र सुस्त वन विभाग याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे. तरी केट्स पॉइंटवरील संरक्षक कठडे उंच बांधण्यात यावेत, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.
सायंकाळी सहानंतर बंदी पण …..
महाबळेश्वरमधील केट्स पॉईंट हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणारा पॉईंट असून, या पॉईंटवर वनविभागाच्या नियमानुसार सहानंतर पर्यटँकांना परवानगी नाकारण्यात येते. या पॉईंटवर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन विभाग देखरेख करीत असता.
सायंकाळी सहा नंतर या पॉईंटवर पर्यटकांना परवानगी नाकारण्यात येते. काही हौशी पर्यटक पॉईंटवर अधिक वेळ बसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी या पॉईंटवर पैसे घेऊन सहानंतर देखील पर्यटकांना सोडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे नियम केवळ वन व्यवस्थापन समितीच्या फायद्यासाठी करण्यात आल्याचे बाेलले जाते.





