सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सीसाठी जागतिक निकषांची गरज : मोदी

नवी दिल्ली – सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सीसाठी जागतिक निकष बनवण्याची गरज आहे. त्या निकषांना आकार देण्यासाठी संयुक्त प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जागतिक समुदायाला केले.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पुढाकारातून झालेल्या लोकशाही शिखर परिषदेत मोदींनी व्हर्च्युअल भाषण केले. सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सी यांसारख्या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानांचा वापर लोकशाही क्षीण करण्यासाठी नव्हे; तर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व्हायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याचा आणि प्रशासनात पारदर्शकता वाढवण्याचा अनुभव जगापर्यंत पोहचवण्यास भारताला समाधानच वाटेल. बहुपक्षीय निवडणुका, स्वतंत्र न्याययंत्रणा, मुक्त माध्यमे ही लोकशाहीतील महत्वाची साधने आहेत. लोकशाही मुल्ये भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत.
लोकशाही असणारे देश एकत्र कार्य करून आपल्या नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करू शकतात. त्यासाठी इतर देशांशी सहकार्य करण्यास भारत तयार आहे. शिखर परिषदेत भारताच्या रूपाने जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान वाटतो, असे मोदी यांनी म्हटले.





