Operation Sindoor । भारत स्वत:हून छेड काढणार नाही, दुसऱ्याने काढली तर..; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Operation Sindoor । पहलगामवरील हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताकडून कडक पाऊले उचलण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना प्रतिउत्तर दिले. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यानंतर संपूर्ण देशातून लष्कराचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भारतीय लष्कराने केलेल्या कामाचं कौतुक शब्दांत करता येणार नाही. इतकं सुंदर काम लष्कराने केलं आहे. भारत स्वतःहून कोणाची छेड काढणार नाही. मात्र, दुसऱ्याने छेड काढली तर सोडायचं नाही. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची ही कारवाई योग्यच आहे, असं अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाले, काही कारण नसताना आपले 26 लोक मारले गेले. त्याचाच सूड भारताने घेतला आहे. त्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही. अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाचीही हिंमत होणार नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
शाहांनी दिले रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे आदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे निर्देश दिले. शाह जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सतत संपर्कात आहेत. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खात्री करण्यासही त्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या कोणकोणत्या ठिकाणांवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
- बहावलपूरमधील दोन ठिकाणं
- मुरीदके
- मुझफ्फराबाद
- कोटली
- गुलपूर
- भिंबर
- चक अमरू
- सियालकोट





