NDA Suicide : एनडीएमध्ये कॅडेटची आत्महत्या ; आत्महत्येमागचं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी (एनडीए) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रथम सत्रातील कॅडेट अंतरिक्ष कुमार सिंह यांनी आज पहाटे आत्महत्या केली. एनडीए प्रशासनाने या घटनेची अधिकृत पुष्टी केली असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी (चौकशी समिती) नेमण्यात आली आहे.एनडीएच्या माहितीनुसार, पहाटे नियमित प्रशिक्षणासाठी उपस्थित न राहिल्याने सहकारी कॅडेट्सनी अंतरिक्ष यांच्या केबिनकडे धाव घेतली असता, ते बेशुद्धावस्थेत आढळले.
त्यांना तत्काळ खडकवासला येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी साडेसहा वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती तातडीने स्थानिक पोलीस, तसेच कुटुंबीयांना देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.एनडीए प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की, कॅडेट अंतरिक्ष कुमार सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे.
या कठीण प्रसंगी एनडीए परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. एनडीएमधील हा प्रकार ऍकॅडमीतील शिस्तबद्ध आणि कडक प्रशिक्षण पद्धतीदरम्यान घडलेला असल्याने, कॅडेट्सच्या मानसिक आणि शारीरिक ताणावाबाबतही तपासात विचार केला जाण्याची शक्यता आहे.
“पोलिसांनए एनडीएकडून अंतरिक्षच्या आत्महत्येची खबर मिळाली आहे; परंतू रॅगिंगसंदर्भात त्यांनी अद्यापही कोणतीच पुष्टी दिली नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असून, मृत विद्यार्थ्यांचे नातेवाईक घटनास्थळी येण्याची प्रतीक्षा केली जात आहे.”
– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन





