Bihar Election : बिहारमध्ये NDAचं ठरलं ! भाजप, जेडीयू समान जागा लढवणार, कुणाला किती जागा? वाचा…

नवी दिल्ली : बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब केले. एनडीएमधील समझोत्यानुसार भाजप आणि जेडीयू हे प्रमुख पक्ष प्रत्येकी १०१ जागा लढवतील. त्यामुळे त्या पक्षांनी छोटा भाऊ-मोठा भाऊ असा वाद निवडणुकीला सामोरे जाताना उद्भवणार नाही याची पूर्ण दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. एनडीएचा आणखी एक महत्वाचा घटक असणारा लोजप (रामविलास) २९ जागा लढवेल. तर, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (रालोमो) या पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी ६ जागा आल्या आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू प्रथमच भाजपपेक्षा अधिक जागा लढवताना दिसणार नाही. त्यातून एनडीएमधील बदललेल्या ताकदीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीत (वर्ष २०२०) जेडीयूने ११५, तर भाजपने ११० जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत जेडीयूपेक्षा कितीतरी अधिक जागा भाजपने जिंकल्या. त्याचा परिणाम यावेळच्या जागावाटपावर दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोजप (रामविलास) हा पक्ष मागील वेळी स्वतंत्रपणे लढला होता. यावेळी एनडीएचा घटक म्हणून अधिक जागा पदरात पाडून घेण्यास तो पक्ष प्रयत्नशील होता.
मात्र, अपेक्षेइतक्या जागा मिळाल्या नसल्या तरी सन्मानजनक वाटा त्या पक्षाला मिळाल्याचे मानले जात आहे. केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांचा हम आणि खासदार उपेंद्र कुशवाह यांच्या रालोमोनेही अधिक जागांचा आग्रह धरला होता. मात्र, कुठली कटूता न येता सलोख्याने जागावाटपावर तोडगा काढण्यात एनडीएला यश आल्याचे दिसते. बिहारमध्ये दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल.





