NDA 149th Batch: एनडीए केवळ लष्करी नाही, राष्ट्रीय चारित्र्याची प्रबोधिनी – डॉ. विजय कुमार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) ही केवळ लष्करी संस्था नसून राष्ट्रीय चारित्र्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय कुमार यांनी केले. शनिवारी झालेल्या एनडीएच्या १४९ व्या तुकडीच्या दिक्षांत समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी एकूण ३२९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली.प्रबोधिनीत मुलींना प्रवेश दिल्यानंतरची दुसरी तुकडी यावेळी बाहेर पडली.
या तुकडीत १४ मुलींचा समावेश आहे. तसेच दोन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनीही प्रशिक्षण पूर्ण केले. एनडीएचे प्रमुख ॲडमिरल अनिल जग्गी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.डॉ.विजय कुमार म्हणाले, येथीले विद्यार्थी भारतीय सैन्य दलांच्या सन्मान, शौर्य, वचनबद्धतेसारख्या सर्वोत्कृष्ट परंपरांचे उदाहरण आहे. मी लडाखमधील चीनबरोबरचा सीमावाद जवळून पाहिला आहे.
तेथील भारतीय सैन्याप्रमाणे आव्हानात्मक स्थितीचा तुम्ही संयमाने, खंबीरपणे सामना कराल, याचा मला विश्वास आहे.एनडीएचे प्राचार्य विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. यात ७२ विद्यार्थ्यांना विज्ञान, ९२ विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान, ५४ विद्यार्थ्यांना कला, तर १११ विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी प्रदान केली.
कार्तिक महेश्वरी याने विज्ञान शाखेत पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल त्याला चिफ ऑफ आर्मी स्टाफ चषक प्रदान केला. संगणक विज्ञानमध्ये प्रथम आलेल्या अनन्या बलुनीला चिफ ऑफ नेव्हल स्टाफ, कला क्षेत्रात अनुराग गुप्ताला चिफ ऑफ एअर स्टाफ तर अभियांत्रिकी शाखेत पुण्याच्या विश्वेश भालेरावला सीआयएससी चषक प्रदान केला.
“माझ्या कुटुंबाला कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नसल्यामुळे एनडीएत प्रवेश घेणे आव्हानात्मक होते. वरिष्ठ, वर्गमित्र, शिक्षक आणि प्रशिक्षकांनी भरपूर मदत केली. माझा येथील अनभव चांगला होता.”
– विश्वेश भालेराव, विद्यार्थी
“आमच्या आधी मुलींच्या एका तुकडीने शिक्षण घेतल्यामुळे आम्हाला प्रशिक्षण घेणं सोपे गेले. जास्तीत जास्त मुलींनी एनडीए प्रवेशासाठी प्रयत्न केला पाहिजे.”
– अनन्या बलुनी, विद्यार्थिनी


