Satara | आठही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चाचपणी

सातारा, (प्रतिनिधी)- राज्यातील विधानसभा निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि समविचारी पक्षांनी एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्यावतीने सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले होते.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने आठही मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. या अर्जांसाठी दि. ५ सप्टेंबर अंतिम मुदत आहे.
लाेकसभा निवडणुकीतील यशानंतर राज्यातील विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तिन्ही पक्ष व समविचारी पक्ष, संघटनांनी राज्यात मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
अद्याप जागा वाटप झाले नसले तरी निवडून येण्याची शाश्वती असणाऱ्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून भक्कम उमेदवार देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
आगामी निवडणुका मोठ्या ताकदीने आणि नियोजनबद्ध लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला असून त्यादृष्टीने दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत.
काँग्रेसने यापूर्वीच जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज घेतले आहेत. त्यानंतर आता महाविकास आघाडीतून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोठ्या ताकदीने घटक पक्षांसहित एकत्रितपणे निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत.
इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज विहित शुल्कासह दि. ५ सप्टेंबरपर्यंत येथील राष्ट्रवादी भवनात सादर करावेत. विहित वेळेत दाखल केलेले परिपूर्ण अर्ज पक्षाची उमेदवारी निश्चित करताना विचारात घेण्यात येणार आहेत.
इच्छुकांनी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे.





