राष्ट्रवादीच्या खेळीने ऐन मतदानाच्या दिवशी भाजपला धक्का! बड्या नेत्याने हाती बांधले घड्याळ

सोलापूर : आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदार प्रक्रिया पार पडली जात आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांप्रमाणेच महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी देखील अनेक ठिकाणी अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच या निवडणुकीत मार्करने बोटाला शाई लावल्याच्या प्रकारामुळे राजकारण देखील तापले आहे. या सगळ्या घडामोडीत सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत अजित पवार यांनी मोठी खेळी करत भाजपला मोठा धक्का दिला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील मोठा नेता राष्ट्रवादीने आपल्या गळाला लावला आहे. त्यामुळे झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजराव डोंगरे तसेच लोकशक्ती परिवाराचे प्रमुख मनोहर डोंगरे यांनी आपल्या समर्थकांसह आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे आता झेडपी निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक समीकरणे बदलणार आहे.
मोहोळ तालुक्यात विजयराज डोंगरे आणि मनोहर डोंगरे या दोन नेत्यांचे मोठे नाव आहे. स्थानिक राजकारणात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. सोलापूर जिल्ह्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांनी ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. विजयराज डोंगरे यांच्या माध्यमातून राजन पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे.
दरम्यान, विजयराज डोंगरे यांचा मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे बुधवारी १४ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेटफळ दौऱ्यावर येणार होते. मात्र, काही कारणामुळे अजित पवार यांचा शेटफळ दौरा अचानक रद्द झाला होता. मात्र, आज अखेर विजयराज डोंगरे यांनी त्यांच्या समर्थकांसह आपल्या हाती घड्याळ बांधले आहे.
हेही वाचा : “…तर मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही”; शाई पुसत असल्याच्या वादावर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण





