NCP News: अजितदादा विमान अपघात चौकशीतील दिरंगाईवरून राष्ट्रवादी आक्रमक
फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

पिंपरी – महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघाताच्या चौकशीला होत असलेल्या विलंबावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करत, चौकशीतील दिरंगाई आणि राजकीय हस्तक्षेपाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, विमान अपघातासारख्या गंभीर घटनेत तातडीने एफआयआर दाखल होणे अपेक्षित असताना, उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूनंतरही गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली. संबंधित कंपनीच्या मालकांशी जवळीक असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होत आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
सीआयडी तपासाचे कारण पुढे करून पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिल्याची बाब संशयास्पद असल्याचे पक्षाने म्हटले आहे. अपघाताला साडेनऊ महिन्यांहून अधिक काळ उलटूनही एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो किंवा राज्य यंत्रणांचा अंतिम चौकशी अहवाल जनतेसमोर आलेला नाही.
चौकशीतील प्रत्येक दिवसाचा विलंब हा संशय अधिक गडद करणारा असून, हा अपघात होता की घातपात, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश संघटक सचिव संदीप चव्हाण, शहर सरचिटणीस जयंत शिंदे, प्रवक्ते व उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, उपाध्यक्ष अमोल गव्हाणे, अनिल भोसले, ॲड. सोपान पाटील, सचिन चावरे, मयूर जाधव, अमोल पाटील, माणिक जैद, सचिव विवेक विधाते, संघटक सचिव सुनील पवार, चिटणीस राजू खंडागळे, नितीन मोरे, ॲड. विजय बाबर, अक्षय घोडके, आशिष पांढरे, शौक कांबळे, अजय पिल्ले, मंगेश असवले, अक्षय कांबळे, सागर दिघाडे, राहुल धनवे, नितीन गुंगासे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





