राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा आज कोरेगाव येथे नागरी सत्कार

कोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांचा महाविकास आघाडीच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमवार दि. २८ जुलै रोजी दुपारी एक वाजता नवीन एस. टी. बस स्थानकासमोरील शिवरत्न मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली हा नगरी सत्कार करण्यात येणार आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, सातारा आणि खटाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण, कोरेगाव तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, खटाव तालुकाध्यक्ष ज्योतिराम सावंत हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक कोरेगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष तसेच समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.





