NCP-SP merger : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोणत्याही पक्षात विलिनीकरण होणार नाही – शशिकांत शिंदे
NCP-SP merger : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा आणि अफवा निराधार असून पक्षाचे कोणत्याही राजकीय पक्षात विलीनीकरण होणार नाही, असा ठाम विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

NCP-SP merger : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा आणि अफवा निराधार असून पक्षाचे कोणत्याही राजकीय पक्षात विलीनीकरण होणार नाही, असा ठाम विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, पक्ष सक्षमपणे कार्यरत असून भविष्यातही स्वतंत्रपणे काम करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ल्हासुर्णे येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाच्या शक्यतेला पूर्णपणे फेटाळून लावत या विषयाला पूर्णविराम दिला. त्यांनी सांगितले की, अवघ्या दोन दिवसांपूर्वी पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. राज्यासह देशातील विविध भागांत पक्ष ताकदीने संघटन विस्तार आणि राजकीय लढती लढत आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जाणीवपूर्वक आमच्या पक्षाबाबत विलीनीकरणाच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. यापूर्वीही पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या. अशा बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या राजकारणावरही भाष्य केले. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीस पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. देशात भाजपला प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी इंडिया आघाडीने एकसंघपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या मताचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी इंडिया आघाडीला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे लढले तर देशाच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळू शकते. संजय राऊत यांनी व्यक्त केलेला हा विश्वास योग्य आणि वास्तववादी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वतंत्र ओळख कायम ठेवून संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचा संदेश शशिकांत शिंदे यांनी या माध्यमातून दिला.





