Uttamrao Jankar : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर लगेचच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. तर दुसरीकडे महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाला. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहेत. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आघाडीवर आहे.
आता पुन्हा एकदा उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. जानकर यांनी थेट दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, दिल्लीत निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ईव्हीएमच्या मुद्यावर आमदार उत्तमराव जानकर आणि माजी मंत्री बच्चू कडू हे 23 जानेवारीला दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाकडे मारकडवाडी आणि धानोरे या दोन गावातील लोकांची प्रतिज्ञापत्र सादर केली जाणार आहेत. तसेच, याचवेळी उत्तमराव जानकर निवडणूक आयोगाकडे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा सादर करणार आहेत.
उत्तमराव जानकर हे माळशिरस विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घेण्याची विनंतीही निवडणूक आयोगाकडे करणार आहेत. तसेच, ही मागणी मान्य न झाल्यास दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जानकर म्हणाले की, माळशिरस तालुक्यातील धानोरे या गावात देखील ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी 1206 लोकांनी हात वरती करून मतदान केले. पण त्या गावात मला 963 मते दाखवण्यात आलेली आहेत. आता धानोरे गावातील 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत.
निवडणूक आयोग मतदानाची पडताळणी करणार नसेल तर 23 जानेवारी रोजी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. माळशिरस मतदारसंघात पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाने मान्य न केल्यास दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. यापूर्वी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात अभिरूप बॅलेट पेपरवर मतदान घेणार असल्याचेही ग्रामस्थांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, नंतर ही प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.