NCP Shirur – शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन प्रमुख गटांमध्ये समन्वय होऊन मतभेद मिटतील आणि आगामी निवडणुकीपूर्वी एकदिलाने ताकद उभी राहील, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात ही अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. तालुक्यात अजूनही दोन्ही राष्ट्रवादी गटांत खऱ्या मनोमिलन न झाल्याने राजकीय वातावरणात संभ्रम, अस्वस्थता आणि नाराजीचे वातावरण कायम आहे. राजकीय पटलावर एकीकडे पक्ष एक असल्याचे दावे केले जात असले, तरी शिरूर तालुक्यात मात्र चित्र वेगळे आहे. दोन्ही गटांकडून स्वतंत्र बैठकांचे सत्र सुरू असून, प्रचाराचे नियोजनही वेगवेगळे केले जात आहे. परस्परांवर होणारी अप्रत्यक्ष टीका आणि जाहीर कार्यक्रमांमधील विसंवाद यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. नेमके कोणाचे नेतृत्व मान्य करायचे आणि कोणाच्या मागे उभे राहायचे, असा मोठा पेच स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.अनेक महत्त्वाच्या गावांमध्ये दोन्ही गटांचे नेते स्वतंत्रपणे संपर्क दौरे आणि बैठका घेत आहेत. एकाच पक्षाचे दोन वेगवेगळे अजेंडे आणि परस्परविरोधी संदेश मतदारांपर्यंत पोहोचत असल्याने राष्ट्रवादीची एकसंध प्रतिमा जनमानसात धूसर होत चालली आहे. “आम्ही एकत्र आहोत” ही केवळ कागदावरील विधाने उरली आहेत का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.वरिष्ठ पातळीवरून समन्वयाचे वारंवार संकेत दिले जात असतानाही शिरूर तालुक्यात मात्र त्याचा कोणताही ठोस परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. जिल्हा परिषद पुणे जुने वर्चस्व टिकवण्याची धडपड, स्थानिक पातळीवरील राजकीय अहंकार, उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा आणि भविष्यातील राजकीय वाटचालीची भीती, यामुळे मनोमिलनाच्या प्रयत्नांना वारंवार खीळ बसत असल्याची चर्चा आहे. दोन्ही बाजूचे प्रमुख नेते एकत्र येण्यास तयार नसल्याने अंतर्गत धुसफूस वाढत चालली आहे. पक्षाच्या ताकदीला बसतोय फटका दोन गटांमधील या विसंवादाचा थेट फटका पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला बसत आहे. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत असून, अनेकांनी “थांबा आणि पाहा” अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीतील ही अंतर्गत वादाची परिस्थिती विरोधकांसाठी फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे विरोधक या विसंवादाचा लाभ उठवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीत किंमत मोजावी लागण्याची शक्यता एकंदरीत शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन प्रवाहांमधील दरी कमी होताना दिसत नाही. जर हे मनोमिलन वेळीच झाले नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. तालुक्याचे राजकारण सध्या तरी “एक पक्ष, दोन प्रवाह” अशा विचित्र कात्रीत अडकलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का…? महाराष्ट्राच्या राजकारणातील दबंग, निर्णयक्षम आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेचा सर्वाधिक परिणाम जाणवत असलेला भाग म्हणजे शिरूर . याच पार्श्वभूमीवर आता तालुक्यात एकच प्रश्न चर्चेत आहे, अजुनही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का?