Rohit Pawar : ईव्हीएम मशीनचे सर्वांसमोर पोस्टमार्टम करा; रोहित पवारांनी केली मागणी

मुंबई : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीला झाल्याचे दिसून आले. पण या वाढलेल्या मतदानावर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशिन यामध्ये 13 टक्के फरक दिसत असल्याचे समोर आले आहे. यावरून आता रोहित पवार आक्रमक झाले आहेत.
काय म्हणाले रोहित पवार?
मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही मोठी वाढ झाली त्यासाठी गाड्या लागल्या असत्या. लोकांची गर्दी दिसली असती, असे रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे ईव्हीएम मशीनचे सर्वांसमोर पोस्टमार्टम करा, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. बहुतांश बूथवर मतदान निवडणूक लवकर संपलं होतं. भोसरीला 1 लाख मतदानाची वाढ झाली आहे. शिरुरमध्ये 71 हजार मतदानाची वाढ झाली. जिथे ही वाढ झाली तिथे महायुतीचा मतदार निवडून आला आहे.
पोस्टलवर 56 टक्के दिसणारे भाजप ईव्हीएमवर 90 टक्क्यांवर गेलंय. ईव्हीएममध्ये 95 पैकी 51 मतदारसंघात ईव्हीएममध्ये जास्त मते आढळली. काही मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतांचा आकडा एखाद्या मशिनद्वारे केला असावा असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
आमच्या उमेदवारांनी चांगला प्रचार केलाय. मोठ्या मार्जिनने हरले आहेत. निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य करावी. मोठे कॅमेरे लावून ईव्हीएम तपासणी करावी. इंटरनेटला कनेक्ट नसणारं पेजरदेखील हॅक होऊ शकत. त्यामुळे आम्हाला ईव्हीएम तपासायच्या आहेत. अशाप्रकारे ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतं, नक्कीच ईव्हीएममध्ये काहीतरी झालंय. तज्ञांच्या मदतीने ही तपासणी व्हायला हवी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
ईव्हीएम मशिनचे रिपोर्ट देण्याची केली मागणी
ईव्हीएम मशिनचे रिपोर्ट आम्हाला द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बऱ्याच ठिकाणी साडेपाच वाजता पोलिंग बंद झालं होतं. तरीसुद्धा 6 वाजण्याआधी मतदान का बंद केलं? याच उत्तर द्यायला हवं.लाडकी बहीण, पैशांचा वापर यामुळे 4 टक्के मत इकडे तिकडे होऊ शकतात. पण 13 टक्के मतदान वाढणे हे संशयास्पद असल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.





