Deepak Mankar: ‘…अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल’, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्यांना दीपक मानकरांचा इशारा

Deepak Mankar on Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. भुजबळ यांच्या समर्थकांकडून आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले जात आहे. समर्थकांकडून पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, नको ते उद्योग करू नका, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
भुजबळ समर्थकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसीचे अनेक नेते आहेत. त्यांचे कर्तुत्व देखील मोठे आहे. जर कोणी वारंवार मी ओबीसी नेता असे म्हणत असेल, तर मी त्याचा निषेध करतो. अजित पवारांनी 4 ओबीसी नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान दिले आहे.
मानकर यांनी यावेळी बोलताना आंदोलन करणाऱ्यांना देखील इशारा दिला. ‘अजित पवारांचा अवमान केल्यास, जशास तसे उत्तर दिले जाईल. अशी भूमिका चालून घेणार नाही’, असा इशारा मानकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.
‘अजित पवार व सुनील तटकरे लवकरात लवकर छगन भुजबळ यांच्याबाबत भूमिका घेतील. भुजबळ साहेबांनी देखील समन्वयाची भूमिका घ्यायला हवी. केवळ ओबीसीचा नेता म्हणून मिरवत असाल, तर असे चालणार नाही.’ असेही पत्रकार परिषदेत बोलताना दीपक मानकर म्हणाले.





