NCP Merger : पवार कुटुंबियात मनोमिलन? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; किरण गुजर यांचा मोठा गौप्यस्फोट
NCP Merger : शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात तासभर सकारात्मक चर्चा; 'अजितदादांचे स्वप्न' पूर्ण करण्यासाठी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींना वेग.

NCP Merger – अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती पवार कुटुंबीयांतील निकटवर्तीय, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.शरद पवार यांनी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे आपल्याला माहीत नसल्याचे विधान केले.
त्यानंतर पवार कुटुंबातील वाद पुन्हा पुढे आल्याचे चित्र समोर आले. वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवार यांची गोविंदबागेत भेट घेतली. कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे बोलले नाहीत. भेटीदरम्यान किरण गुजर उपस्थित होते. त्यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत पार्थ पवार व शरद पवार यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे गुजर यांनी स्पष्ट केले. गुजर म्हणाले की, वेगवेगळे समज- गैरसमज निर्माण केले जात आहेत. याबाबत सकारात्मक चर्चेची गरज होती. तशा प्रकारची चर्चा झाली.
अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाला पार्थ पवार यांनी देखील दुजोरा दिला आहे.याबाबत सहयोग निवासस्थानी पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे गुजर यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांची गटनेतापदी निवड तसेच सत्तेतील सहभाग हा प्रक्रियेचा भाग आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय राज्य पातळीवरील नेतेमंडळी करणार आहेत. याबाबत पवार कुटुंबीय सकारात्मक आहेत. दि.१२ रोजी राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार, अशी चर्चा होती या प्रश्नावर विलीनीकरण नक्की होणार आहे, असे गुजर यांनी सांगितले.
गोविंदबागेत एक तास चर्चा
शरद पवार यांनी खुलासा केल्यानंतर पार्थ पवार यांनी थेट गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन बारामतीला आल्याची चर्चा रंगली होती. पार्थ पवार यांची शरद पवार यांच्यासोबत १ तास चर्चा झाली.
यावेळी रोहित पवार, सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते. शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पार्थ पवार हे सहयोग निवास्थानी गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांनी फोनवर चर्चा केली.






