Hasan Mushrif : विलिनीकरणाच्या चर्चांवर राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले ‘चर्चेमध्ये फक्त…’
Hasan Mushrif : विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केले आहे.

Hasan Mushrif : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत १० आणि १२ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले. या दोन्ही पत्रकार परिषदा वेगवेगळ्या कारणांसाठी असणार आहेत.
१० फेब्रुवारीची पत्रकार परिषद अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत असणार आहे. तर १२ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत बोलणार आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विलिनीकरणाबाबत मोठं विधान केले आहे.
‘विलिनीकरणाच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या चर्चेमध्ये फक्त अजित दादा होते, आम्ही कोणीही प्रमुख माणसे नव्हतो असा आमचा दावा आहे. जर सुनेत्रा वहिनी, कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते एकत्रीकरणाच्या मताचे असतील तर त्यामध्ये कोणतीही अडचण येण्याचे कारण नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तीच माझी भूमिका असेल.’ असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे असले तरी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. २८ जानेवारीला अजित पवार हे याच निवडणुकीच्या प्रचारासाठी एका सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीकडे विमानाने रवाना झाले. मात्र, विमानाचा भीषण अपघात झाला आणि अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात निधन झाले.
रोहित पवार म्हणाले…
रोहित पवारांनी मतदान केल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रेयवरून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.‘दादांच शेवटचं स्वप्न पूर्ण होईल आणि जिल्हा परिषदेत जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील,’ असे रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच १० आणि १२ फेब्रुवारीला रोहित पवार पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा : POK Issue: पीओकेवरून पाकिस्तानला मोठा धक्का ; अमेरिकेनेही भारताचाच भाग असल्याचे केले मान्य






