पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? दत्तात्रय भरणेंनी थेट नावच घेतले, म्हणाले…

Pune Guardian Minister: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन खातेवाटप देखील झाले आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. पालकमंत्रीपदासाठी प्रत्येक पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच (अजित पवार गट) नेते दत्तात्रय भरणे यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
पुण्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवारच असतील, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आमदार चंद्रकांत पाटील देखील इच्छुक असल्याचे सांगितले जाते. त्याच पार्श्वभूमीवर आता भरणे यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्य दिनानिमित्त दत्तात्रय भरणे आले होते. यावेळी त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं.
यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात कोणतीही रस्सीखेच सुरू नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य निर्णय घेतील. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणी काहीही म्हणत असले तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी अद्याप पदभार का स्विकारला नाही? या प्रश्नावर देखील उत्तर दिले. ‘मी बाहेर गेलो होतो. पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहs, मी नाराज नाही. नाराजीच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.’, पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.




