“रस्त्याची स्थिती सुधारली नाही तर…”, नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे छगन भुजबळ आक्रमक

नाशिक – नाशिक-मुंबई महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे हा महामार्ग खराब झाला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आक्रमक झाले आहेत. त्यांनी म्हटले आहे की येत्या 1 नोव्हेंबर पर्यंत या रस्त्याची स्थिती सुधारली नाही तर येथील टोल नाके बंद पाडण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला आहे. भुजबळ यांनी या रस्त्याची आज पहाणी केली त्यानंतर त्यांना पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला.
त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना हे खड्डे दाखवून फैलावर घेतले आणि त्यांची कानउघडणी केली. येत्या 31 तारखेपर्यंत ही स्थिती दुरूस्त करा अन्यथा या रस्त्यावरील टोल केंद्रे बंद पाडली जातील असेही त्यांनी या अधिकाऱ्यांना सुनावले आहे. या महामार्गावर मोठी वाहतूक होत असते. मुंबईत कामाला जाणाऱ्या अनेकांना या रस्त्याचा मनस्ताप होतो आहे.
#AnilDeshmukh | अनिल देशमुख प्रकरणात तपास यंत्रणांचा वेळकाढूपणा, न्यायालयाने फटकारले
मालवाहतूकदारही या रस्त्याच्या स्थितीला वैतागले आहेत. त्यांनी भुजबळांना ( Chhagan Bhujbal ) या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी अधिकाऱ्यांना बोलावून ही स्थिती त्यांच्या निदर्शनाला आणली. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना यात लक्ष घालण्याचे मान्य केले आहे पण भुजबळांनी दिलेल्या निर्धारीत वेळेत ही रस्ते दुरूस्ती होईल की नाही हे पहाणे आता औत्स्युक्याचे ठरले आहे.



