राष्ट्रवादी कॉंग्रेसने मावळमध्ये साधले “टायमिंग’

पिंपरी – मावळमध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारीची माळ गळ्यात घातली. 93 हजार 463 मतांनी त्यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पराभवाची धूळ चारली. त्यांच्या माध्यमातून 25 वर्षात प्रथमच मावळवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. मावळातील लढत अत्यंत अटीतटीची होईल, अशी सर्वसामान्यांसह राजकीय तज्ञांची अपेक्षा होती. मात्र शेळके यांनी एकतर्फी विजय मिळवित मावळात भाजपाच्या अपेक्षांवर पाणी फेरले.
पिंपरीत शिवसेनेचे आमदार ऍड.गौतम चाबुकस्वार यांचा राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी 19 हजार 808 मतांनी पराभव केला. चाबुकस्वार यांना विजय सोपा होता मात्र अतिआत्मविश्वास आणि यंत्रणा कार्यान्वित करण्याबरोबरच महायुतीच्या शहरातील नेत्यांना सोबत घेण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांना पराभव सहन करावा लागला.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना विजयासाठी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना कडवी झुंज द्यावी लागली. 38 हजार 498 मतांनी त्यांचा पराभव झाला.





