NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना देण्यात येणाऱ्या NCMC स्मार्ट कार्डची जास्त दराने विक्री केल्याचे समोर आले. या प्रकरणाची दखल घेत अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. इतकेच काय तर, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. NCMC Card ST Bus महिला, ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. याशिवाय NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरात 3000 हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. NCMC Card नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक (NCMC Card) दरम्यान, एसटी बसमध्ये आधार कार्ड आणि साधे ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकीटात प्रवास करणाऱ्या महिला आणि शंभर टक्के सवलत घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना आता सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात आली आहे. हे कार्ड घेऊनच आता लालपरीचा प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. या कार्डमुळे प्रवास आता सुलभ, सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक होणार असल्याचा दावा केला जात आहे. हेही वाचा: अग्रलेख : बायपोलर सिस्टीमकडे