Election Result : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय स्थिती नेमकी कशी वळण घेत आहे याचे काही संकेत मिळत आहेत. पहिली गोष्ट तर ही की आता देशात स्वतंत्रपणे सत्तेवर असलेल्या प्रादेशिक राजकीय पक्षांचे अस्तित्व अगदी मोजकेच शिल्लक राहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर तेथील एका प्रादेशिक पक्षाची प्रदीर्घ काळ चालत आलेली सत्ता संपुष्टात आली आणि भारतीय जनता पक्ष नावाच्या राष्ट्रीय पक्षाने ते राज्य आपल्या कवेत घेतले. देशात आता प्रादेशिक पक्ष सत्तेवर असलेली दोनच मुख्य राज्य अस्तित्वात आहेत. एक आंध्र प्रदेशातील तेलगू देशम आणि जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स. हे दोन पक्ष वगळता सत्तेवर असलेल्या स्वतंत्र राजकीय प्रादेशिक पक्षांची सद्दी आता संपली आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार आहे पण तो पक्ष काँग्रेसच्या आघाडीतील पक्ष म्हणून ओळखला जातो. आंध्र प्रदेशातील तेलगू देशम पक्षसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या आघाडीतील पक्ष म्हणूनच गणला जातो. त्यामुळे स्वतःचे वेगळे राजकीय अस्तित्व किंवा प्रभुत्व टिकवून धरणारा एकही प्रादेशिक पक्ष आता देशात सत्तेवर नाही. पंजाबात आम आदमी पक्षाची सत्ता आहे तो एक अपवाद आहे. पण आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता पावलेला पक्ष आहे. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर देशात आता केवळ भाजप आणि काँग्रेस अशा दोनच राजकीय पक्षांचा पर्याय जनतेपुढे उपलब्ध असेल. म्हणजे एका अर्थाने आपल्या राजकीय सिस्टीमची वाटचाल आता बायपोलर राजकीय सिस्टीमच्या दिशेने गेलेली दिसते आहे. खूप पूर्वी देशात काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. त्याला पर्याय म्हणून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या विलीनीकरणातून जनता पक्षाचा पर्याय उभा केला होता. त्यावेळी जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आज प्रदीर्घ काळानंतर उभी राहिलेली दिसते आहे. देशात आज विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे संपूर्ण देशभर थोड्याफार प्रमाणात का होईना अस्तित्व आहे. चार राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला प्रभावी टक्कर द्यायची असेल तर काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक सक्षम पर्याय उभा करण्याखेरीज देशातल्या प्रादेशिक पक्षांपुढे पर्याय उरलेला नाही. विविध ठिकाणच्या प्रादेशिक पक्षांनी केंद्रात आजवर जे आघाडी सरकारचे राजकारण किंवा सत्ताकारण चालले होते त्यात केवळ आपली मनमानीच करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रातील सरकार कायम अस्थिर असल्याची भावना प्रबळ होत गेली. जी काँग्रेसेतर सरकारे जनता पार्टीच्या काळानंतर केंद्रात सत्तेवर आली त्यात विविध प्रादेशिक पक्षांचा वाटा मोठा होता आणि त्यांनी आपापले हित साधण्यासाठी केंद्र सरकारला वेठीला धरण्याचेच काम केले. आज केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकारसुद्धा एनडीए आघाडीचे सरकार असले, तरी भारतीय जनता पक्षाचा एकछत्री अंमल आणि धाक त्या आघाडीवर आहे. अगदी नितीश कुमार यांच्यासारखा मातब्बर प्रादेशिक पक्षाचा नेतासुद्धा मोदी आणि शहा यांच्या विरोधात कुठलेही खुले मतप्रदर्शन करताना दिसत नाहीत. आता या नवीन राजकीय परिस्थितीत अडचणीत आलेल्या काँग्रेसला कायम कचाट्यात पकडण्यासाठी जे प्रादेशिक पक्ष सातत्याने अग्रेसर असायचे तेही बहुतांशी अस्तित्वहीन झालेलेच पाहायला मिळत आहेत. या स्थितीचा लाभ उठवून देशात एक सक्षम राजकीय पर्याय निर्माण करण्याची संधी काँग्रेसला चालून आली आहे. त्यांनाही आता या बदलत्या परिस्थितीत कुठल्याही प्रादेशिक पक्षाचे फार ओझे बाळगण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकजिनसी राजकीय पर्याय उभा राहू शकतो आणि काळाची गरज म्हणून काँग्रेसचे महत्त्व आणि वर्चस्व एकमुखाने मान्य करून ही आघाडी भक्कम करण्याची जबाबदारी अडचणीत सापडलेल्या अन्य प्रादेशिक पक्षांना उचलावी लागेल. जर यदाकदाचित पश्चिम बंगालमध्ये अत्यंत अवघड परिस्थितीत ममतांनी सत्ता टिकवली असती तर त्यांच्या नेतृत्वाला मोठे वलय निर्माण झाले असते आणि देशातील अन्य प्रादेशिक पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली एक येऊ शकले असते. त्या परिस्थितीत काँग्रेस बाजूला पडली असती. पण आज काँग्रेसच्या सुदैवाने ममता बॅनर्जी स्वतःच अडचणीत आल्याने आता काँग्रेसनेसुद्धा खुल्या दिलाने या सर्व राजकीय पक्षांना आपल्या पंखाखाली अधिकारवाणीने एकत्र घ्यायला हवे. आघाडी सरकारच्या काळात डाव्या पक्षांच्या आघाडीचे अस्तित्व मोठे असायचे आणि तेही प्रत्येक वेळी आपल्यावर अवलंबून असलेल्या केंद्र सरकारांना सातत्याने अडचणीत आणण्याचे काम करायचे. पण आता डाव्या आघाडीकडेसुद्धा देशातल्या एकाही राज्याची सत्ता उरलेली नाही. त्यामुळे ही डावी आघाडीसुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपला समर्थ पर्याय देण्याचे जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टासाठी कार्यरत राहील अशी अपेक्षा आहे. देशाच्या या नव्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर या पुढील काळात याच दिशेने आणखी काही घडामोडी अपेक्षित आहेत. त्यातून ही देशाची बायपोलर राजकीय सिस्टीम आणखी काही काळ तरी बळकट होत जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा : Bengal Election 2026: बंगालमध्ये टीएमसी कार्यालयावर फिरले बुलडोझर ; तृणमूल म्हणाले,” भाजपने…”