Naxalite Killed : अबुझमाड जंगलात चकमक! नक्षलवाद्यांच्या आणखी 2 म्होरक्यांचा खात्मा

नारायणपूर : नक्षलवाद्यांच्या आणखी २ म्होरक्यांचा सुरक्षा दलांनी सोमवारी खात्मा केला. ती चकमक अबुझमाड जंगलात महाराष्ट्राच्या हद्दीत घडली. राजू दादा उर्फ कट्टा रामचंद्र रेड्डी (वय ६३) आणि कोसा दादा उर्फ कादरी सत्यनारायण रेड्डी (वय ६७) अशी मारल्या गेलेल्या नक्षली म्होरक्यांची नावे आहेत.छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यातील जंगलात नक्षलींचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.
त्याआधारे सुरक्षा जवानांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली. त्या माेहिमेवेळी जंगलाने व्यापलेल्या लगतच्या महाराष्ट्रातील भागात सुरक्षा जवानांची पथके पोहचली. तिथे सुरक्षा जवान आणि नक्षली आमनेसामने येऊन त्यांच्यात चकमक झडली. काही तासांनंतर चकमक थांबली. त्यानंतर तिथे २ नक्षलींचे मृतदेह आढळले. चकमकीच्या ठिकाणावरून सुरक्षा जवानांनी एके-४७ रायफल, इन्सास रायफल आणि स्फोटकांचा साठा जप्त केला.
ठार झालेल्या नक्षलींची ओळख पटली. ते नक्षलींचे म्होरके राजू दादा आणि कोसा दादा असल्याचे स्पष्ट झाले. ते नक्षलींची संघटना सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. सुमारे ३ दशकांपासून ते सक्रिय होते. मूळचे तेलंगणाचे रहिवासी असणाऱ्या दोन्ही म्होरक्यांसाठी प्रत्येकी ४० लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यांचा खात्मा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.
देशाला नक्षलवादमुक्त बनवण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. तो पूर्ण करण्यासाठी सुरक्षा दले नक्षलींविरोधात धडक मोहिमा राबवत आहेत. त्या मोहिमांची तीव्रता छत्तीसगढमध्ये सर्वांधिक आहे. त्यातून त्या राज्यात चालू वर्षी आतापर्यंत २४९ नक्षली मारले गेले. त्यामध्ये काही म्होरक्यांचाही समावेश आहे. सुरक्षा दलांच्या मोहिमांमुळे जबर तडाखा बसत असल्याने नक्षली संघटना बॅकफुटवर गेल्या आहेत.





