नवाजुद्दीन सिद्दीकीला भविष्यात साकारायची ‘या’ प्रसिध्द व्यक्तीची भूमिका

Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येत मोठे यश संपादन केले आहे. अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात त्याने मोठे नाव कमावले. नक्कीच यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला. सध्या आनंद सुरापूर दिग्दर्शित “रौतू की बेली” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवला जाणार आहे.
याप्रकरणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी भविष्यात कोणाची भूमिका करण्यास आवडेल, याबाबत सांगितले आहे. “मला भविष्यात संधी मिळाली तर आध्यात्मिक गुरु ओशो यांची भूमिका साकारायला मला आवडेल,” असे त्याने सांगितले. दरम्यान, ओशो हे आध्यात्मिक गुरू आहेत. महान दार्शनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ओशोंचं पूर्ण नाव रजनीश चंद्रमोहन जैन होतं. 11 डिसेंबर 1931 रोजी मध्यप्रदेशातील कुचवाडा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी मध्यप्रदेशातील जबलपूर महाविद्यालयातून दर्शनशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी जबलपूर विद्यापीठात दर्शनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं काम केलं. विद्यार्थ्यांमध्ये आचार्य रजनीश नावाने ते प्रसिद्ध होते.
या पत्रकार परिषदेत नवाजुद्दीनने चित्रपटातील भूमिका निवडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत तो म्हणाला की, “मी कधीच स्वतःला एका साच्यात बसवलेलं नाही. याचं संपूर्ण श्रेय माझ्या दिग्दर्शकांना जातं, त्यांनी कायम माझ्याकडून काहीतरी वेगळं काढण्याचाच विचार केला. कधी कधी आम्ही जे प्रयोग करतो ते फसतात, पण हीच खरी संधी असते शिकायची. आयुष्यातील हे धडे गिरवण्यासाठीच मी वेगवेगळ्या भूमिका करतो.”
नवाजुद्दीनचा ‘रौतु की बेली’ हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असणार आहे असंही नवाजुद्दीनने या मुलाखतीदरम्यान सांगितले. दरम्यान, नवाझुद्दीनने 1999साली प्रदर्शित झालेल्या सरफरोश चित्रपटातील छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने गँग्स ऑफ वासेपूर, सीरिअस मॅन, हड्डी, सेक्रेड गेम्स यासारख्या दमदार चित्रपटातून आपल्या अभिनयाची उत्तम छाप प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली.





