नवाझ शरीफ यांचा पक्ष ठरला पाक संसदेतील सर्वात मोठा पक्ष

नवी दिल्ली – नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गट हा पक्ष पाकिस्तानच्या संसदेमधील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. संसदेतील राखीव जागा माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाठिंबा असलेल्या सुन्नी इत्तेहादुल कौन्सिल या पक्षाला देण्यास सभापतींनी नकार दिला आणि या जागा पीएमएल-एन पक्षाला देण्यात आल्या. त्यामुळे पीएमएल-एन पक्षाची सदस्य संख्या वाढून १२३ इतकी झाली आहे.
राखीव जागांमध्ये वाटा मिळावा, याचसाठी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलेले सर्व ९३ अपक्ष सदस्य सुन्नी इत्तेहादुल कौन्सिल पक्षामध्ये सामील झाले आहेत. मात्र पीटीआय पक्षाचा पाठिंबा असलेला एसआयसी संसदेतील महिला आणि अल्पसंख्यांकांसाठीच्या राखीव जागा मिळण्यासाठी पात्र नाही. त्यामुळे या राखीव जागा अन्य पक्षाला देण्यात याव्यात, असे निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले.
संसदेत निवडून आलेल्या २६६ सदस्यांच्या प्रमाणात राखीव जागांचे वाटप करण्यात आले. संसदेतील एकूण ३३६ जागांमध्ये महिलांसाठी ६० आणि अल्पसंख्यांकांसाठी १० जागा राखीव आहेत. लोकप्रतिनिधींच्या प्रमाणात या जागा सत्तारुढ पक्षाला देण्यात आल्या.
पीएमएल-एन पक्षाने निवडणुकीत ७५ जागा जिंकल्या होत्या. निवडून आलेले ९ अपक्ष देखील नंतर या पक्षामध्ये सामील झाले होते. राखीव जागांपैकी १९ जागा पीएमएल-एनला देण्यात आल्या होत्या. यामुळे पीएमएल-एन पक्षाची एकूण सदस्य संख्या १०७ इतकी झाली होती.
एसएयसीला जागा देण्यास नकार देण्यात आल्यानंतर महिलांसाठीच्या १५ आणि अल्पसंख्यांकांसाठीची एक जागा देखील पीएमएल-एनला मिळाली. यामुळे पीएमएल-एनची एकूण सदस्य संख्या १२३ झाली. यामुळे हा पक्ष पाकिस्तानच्या संसदेतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
याचप्रमाणे पाकिस्तान पीपल्स पार्टीची सदस्य संख्या देखील ६८ वरून वाढून ७५ झाली. निवडणुकीत पीपीपीला अवघ्या ५४ जागा मिळाल्या होत्या. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तानची संख्या २२ आणि जमियत उलेमा ए इन्साफ (एफ) ची संख्या ११ झाली आहे.





