मुंबई : भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिक हे महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचं स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत नवाब मलिक आज व्यासपीठावर दिसून आल्याने त्यांची भूमिका उघड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मलिक कोणाकडे राहणार, यावरुन राष्ट्रवादीत रणकंदन सुरू होतं. अखेर आता नवाब मालिकांची भूमिका जाहीर झाली आहे. यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सना मलिक यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी अजित पवार यांनी सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्यात येत असलेल्या जबाबदारीची घोषणा केली. सना मलिक वडिलकीच्या नात्याने माझ्याकडे येत असते. तिच्या विधानसभा क्षेत्रातील लोकांची कामं ती घेऊन येत असते. आज मी जाहीर करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सना मलिक ही स्पोकपर्सन प्रवक्ता असेल. एक मोठी जबाबदारी आपण तिला देत आहोत, असे म्हणत अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या कन्येकडे मोठी जबाबदारी दिली आहे. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत मलिक यांच्या भूमिकेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली होती. जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती अशी खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली.