Navneet Rana : राज्यसभा सीट नवनीत राणांना मिळण्याची मोठी शक्यता, तर अमोल मिटकरींचा विरोध
राज्यसभेच्या या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून आहे. त्यामुळे इच्छुकांकडून विविध स्तरांवर बैठका आणि संपर्क वाढवण्यात आले आहेत.

Navneet Rana – महाराष्ट्रातील राज्यसभेची एक जागा रिक्त झाल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी आता जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर होत आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.तसेच, त्याआधी त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचीही भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेसाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगली आहे.
ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने पक्षांतर्गतही हालचाली तीव्र झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे समजते. अशातच, नवनीत राणांच्या नावाची चर्चा वाढताच राष्ट्रवादीतील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे.
या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे आणि त्यावर इतरांनी दावा करू नये, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, पक्षात अजित पवार यांचे नेतृत्व अंतिम असून, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तोच सर्वांना मान्य असेल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यसभेच्या या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून आहे. त्यामुळे इच्छुकांकडून विविध स्तरांवर बैठका आणि संपर्क वाढवण्यात आले आहेत. पक्ष नेतृत्व अखेर कोणाच्या गळ्यात राज्यसभेची माळ घालते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






