Navneet Kaur Rana : “नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन…”; नवनीत राणांनी अधिकाऱ्यांना भरला दम

अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून माजी खासदार आज चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यांनी थेट या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना फोनवरून सज्जड दम भरला आहे. “जिल्हा रुग्णालयात स्वच्छता करा. नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन”; अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना दम दिला.
काय आहे नेमके प्रकरण?
अमरावती जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेचा अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतची तक्रार काही कार्यकर्त्यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर राणा यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन करून सदर घटनेचा जाब विचारला.
काय म्हणाल्या नवनीत राणा ?
अधिकाऱ्यांना फोनवरून दम देताना राणा म्हणाल्या; “मी तिकडे आले तर खूप धिंगाणा होऊन जाईल.मी आज रुग्णालयातील काही फोटो बघितले. तिथले वॉशरुम इतके अस्वच्छ आहेत की कोणताही गरीब पेशंट आणि इतर कुणीही तिकडे जाऊ शकत नाही. स्वच्छतेचं कंत्राट ज्यांनी घेतलं आहे ते काय करत आहेत? सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटाचे पैसे देते आणि एकही माणूस तिथे जाऊ शकत नाही. एवढ्या उन्हात ते कुठे जातील?”, असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारले.
तसंच यावेळी त्यांनी कंत्राटदार कोण आहे? असं विचारत नियमित साफसफाई करणारे कोण आहेत? आजच्या आज साफसफाई झाली नाही तर मला साफसफाई करणाऱ्यांचे संध्याकाळी फोटो पाहिजेत, असा आदेशच त्यांनी दिला. सध्या त्यांचा अधिकाऱ्यांना दम देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.





