“कॉंग्रेसमध्ये आता शुध्दीकरणाची आवश्यकता..” नवज्योत सिंग सिद्धूचा स्वपक्षाला सल्ला

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश कॉंग्रेसमधील राजकीय उलथापालथीनंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग सिध्दू यांनी आपल्या पक्षाच्या सहा आमदारांवर टीका केली आहे. पक्षात आता शुध्दीकरणाची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस पक्षाची संपत्ती आणि पक्षाची देणी किती आहेत याचे आकलन करण्याची मागणी करणारे हिमाचलमधील अपयश आहे. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांच्या इशाऱ्यांवर इकडून तिकडे नाचणारे अनेक बदमाश पक्षात आहेत.
ज्यांनी सार्वजनिक हिताच्या ऐवजी स्वहिताला प्रधान्य दिले अशा नेत्यांपासून कॉंग्रेसला मुक्तता मिळाली आहे असे सिध्दू यांनी नमूद केले. ते म्हणाले कालच्या निकालामुळे केवळ डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांचे नुकसान झाले नाही तर त्यापेक्षा हे नुकसान खूप मोठे आहे.
स्वत:च्या हिताला प्राधान्य देणाऱ्यांना पक्षाच्या बाहेर काढण्याची गरज आहे. त्यांच्या कृतीमुळे पक्षाच्या अस्तित्वावरच घाव बसत असतात. झालेल्या जखमा भरतीलही. मात्र जे मानसिक घाव झाले आहेत ते राहतील.





