Navjot Singh Sidhu : राजघाट परिसरात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्मारक बनवावे; नवज्योतसिंग सिद्धू यांनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र

चंदिगढ : दिल्लीतील राजघाट परिसरात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्मारक बनायला हवे. तसा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशी विनंती करणारे पत्र कॉंग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले. राजघाट हे अतिशय महत्वाचे स्थळ आहे.
आपल्या देशाच्या प्रमुख नेत्यांच्या वारशाची स्मृती ठेवण्यासाठी गौरवशाली परंपरेचे प्रतीक म्हणून त्या स्थळाकडे पाहिले जाते. बहुतांश माजी पंतप्रधानांची स्मारके तिथे आहेत. मात्र, सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यविधी झाल्याने ती परंपरा खंडित झाली. त्या परंपरेचा सन्मान राखला जावा. सिंग यांचे स्मारक राजघाट परिसरात उभारले जाण्याची निश्चिती करावी, असे साकडे सिद्धू यांनी पत्रातून घातले.
क्षुद्र राजकारण केले जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सिंग यांच्या अंत्यविधीसाठी निवडण्यात आलेले ठिकाण आणि त्यांच्या प्रस्तावित स्मारकावरून याआधीच वादंग निर्माण झाले आहे. मोदी सरकार सिंग यांचा अवमान करत असल्याची टीका कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून केली जात आहे.





