Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ फलकाला काळे फासणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अन्यथा इतर नाव खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला होता. मात्र, पनवेल महापालिकेला इशारा दिल्यानंतर काही मिनिटांतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी नवीन पनवेल येथे पालिकेने उभारलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दिशादर्शक फलकावर काळे फासून संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर पनवेल महापालिका आणि पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी चार ते पाच तरूणांवर गुन्हा नोंदवला आहे. यावेळी हे तरूण कोण आहेत, हे उघडकीस न आल्याने अनोळखी तरुणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पनवेलमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेकापच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पनवेलमधील कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता वाढल्याचे चित्र आहे.
मनसेने यामध्ये पुढाकार घेतला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या राजधानीत लेडीज सर्व्हीस बारविषयी चिंता व्यक्त केली होती. तो देखील मनसैनिकांकडून फोडण्यात आला होता.





