ब्रुसेल्स : युक्रेनला सुरक्षा हमी देण्याच्या मुद्दयावरून नाटोच्या संरक्षण प्रमुखांची आज आभासी माध्यमातून बैठक होते आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी पाश्चात्य देशांनी आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. त्यासाठी युक्रेनच्या संभाव्य विभाजनासाठी युक्रेनला सुरक्षा हमी देणे गरजेचे आहे. ही हमी युक्रेनला कशी देता येऊ शकेल, याबाबत आजच्या बैठकीत विचार सुरू आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राजनैतिक प्रयत्नांमुळे नाटोतील ३२ संरक्षण प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतील आणि लढाई संपवण्याचा प्रयत्न करतील, असे नाटोच्या लष्करी समितीचे अध्यक्ष इटालियन ॲडमिरल गिउसेप्पे कावो ड्रॅगोन म्हणाले. नाटोचे युरोपसाठीचे सर्वोच्च सहयोगी कमांडर अमेरिकन जनरल अॅलेक्सस ग्रिन्केविच हे चर्चेत भाग घेतील, असेही ड्रॅगोन म्हणाले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मॉस्कोच्या सहभागाशिवाय युक्रेनमधील सुरक्षा व्यवस्थांवर काम करण्याच्या प्रयत्नांना फटकारले आहे. आता रशियाशिवाय सामूहिक सुरक्षा समस्या सोडवण्याचा प्रस्ताव आहे. या वस्तुस्थितीशी आम्ही सहमत होऊ शकत नाही. हे प्रयत्न यशस्वी होओऊ शकणार नाहीत असे लावरोव्ह बुधवारी म्हणाले. रशिया आपल्या वैध हिताचे रक्षण करण्याचा विचार करेल, असे जॉर्डनचे परराष्ट्र मंक्षी आयमान अल-साफादी यांंच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत लावरोव म्हणाले. दरम्यान ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे झेलेन्स्की आणि पुतीन यांच्यातल्या परत्यक्ष चर्चेची तयारी सुरू असून ही बैठक स्वित्झर्लंडमध्ये होण्याची शक्यता आहे.