National Sports Day : टेबल टेनिसच्या विश्वात चॅम्पियन्स घडविणारी अकादमी
पुण्यातील ‘चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमी’ (सीटीटीए) गेल्या काही वर्षांपासून या खेळाला प्रोत्साहन देण्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचे काम सातत्याने करीत आहे.

National Sports Day : राष्ट्रीय क्रीडादिनाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्राचा विचार करताना टेबल टेनिसकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पुण्यातील ‘चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमी’ (सीटीटीए) गेल्या काही वर्षांपासून या खेळाला प्रोत्साहन देण्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचे काम सातत्याने करीत आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये रिषिता येळवंडे, प्रिया वर्टिकर आणि पूर्वा वर्टिकर यांच्या पुढाकारातून कोथरूडमधील म्हातोबा मंदिर परिसरात या अकादमीची स्थापना झाली. मर्यादित सुविधांमध्ये सुरू झालेल्या या प्रवासाला खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादातूनच अकादमीने विस्ताराची वाट धरली आणि पुण्यातील रहाटणी, कोथरूड, आयडियल कॉलनी आणि नांदेड सिटी टाउनशिप येथे चार सुसज्ज प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.
प्रशिक्षकांची अनुभवी फळी
सीसीटीएच्या यशामध्ये प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. सोमेन सहा यांनी 2019 ते 2024 या कालावधीत अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांना स्पर्धात्मक टेबल टेनिससाठी तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. कोथरूडमधील म्हातोबा मंदिर क्लबमध्ये रिषिता येळवंडे, रहाटणी येथे पूर्वा वर्टिकर, तर नांदेड सिटी टाउनशिप येथे मेट्रो सिटी क्लबमध्ये लक्ष्मणदास वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कोचेस काम पाहतात.
त्याचबरोबर बंगालमधील शंखनील बसाप, राजदीप सहा आणि कौशिकी सरकार, मणिपूरचे लांथोयबा वायकोम आणि ओक्राम बिश्वनाथ, उत्तर प्रदेशच्या शिवानी निशाद यांच्यासह स्वप्नाली नारळे, पूजा जोरवर, धनश्री पवार आणि अंजली वैष्णव हे प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहेत. विशेषतः बंगालमधून आलेल्या प्रशिक्षकांचा अनुभव सीसीटीएच्या खेळाडूंना लाभत आहे. टेबल टेनिसमध्ये बंगालला मोठी परंपरा असल्याने तेथील तांत्रिक बारकावे आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन पुण्यातील खेळाडूंना आत्मसात करता येत आहेत.
वयाची मर्यादा नाही; प्रत्येकासाठी स्वतंत्र प्रशिक्षण
टेबल टेनिस शिकण्यासाठी येणार्या प्रत्येक खेळाडूची शारीरिक क्षमता, कौशल्य, अनुभव आणि ध्येय वेगवेगळे असते. ही बाब लक्षात घेऊन सीसीटीएमध्ये केवळ वयाला महत्त्व न देता खेळाडूची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे नियोजन केले जाते. नवशिक्या खेळाडूंपासून स्पर्धात्मक स्तरावर खेळणार्या खेळाडूंपर्यंत प्रत्येकासाठी स्वतंत्र प्रशिक्षण पद्धती विकसित करण्यावर भर असतो. रॅकेट हाताळण्याचे प्राथमिक तंत्र, फुटवर्क आणि बॉलवरील नियंत्रणापासून सामन्यातील रणनीती, मानसिक तयारी आणि दबावाच्या परिस्थितीत निर्णय घेण्यापर्यंत विविध पैलूंवर प्रशिक्षण दिले जाते. टेबल टेनिस हा वेगवान खेळ असल्याने क्षणार्धात निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे तांत्रिक कौशल्यासोबतच एकाग्रता, चपळता, संयम, सातत्य आणि मानसिक कणखरता विकसित करण्यावरही अकादमीचा भर आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश
अकादमीच्या वाटचालीतील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे येथून घडलेल्या खेळाडूंची कामगिरी. पृथा वर्टिकर हिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविण्यासह महाराष्ट्रातील अनेक राज्यस्तरीय किताब पटकावले आहेत. विशेष म्हणजे वयाच्या 19 वर्षांपर्यंत तिने विविध वयोगटांत राष्ट्रीय स्तरावर तब्बल 15 वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ती ‘खेलेगा इंडिया’च्या अकादमीत सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. समृद्धी कुलकर्णी हिने महाराष्ट्र राज्य विजेतेपद मिळविले आहे. सई कुलकर्णी, आदित्य सामंत आणि देवयानी कुलकर्णी यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नाभा किरकोळे हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. गुजरात राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक मिळविणार्या पवन चौरसिया याचाही अकादमीच्या यशस्वी खेळाडूंमध्ये समावेश आहे. अकादमीच्या खेळाडूंमध्ये ऊर्वी सुरळेकर हिने गोव्याच्या अंडर-19 तसेच महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेत राज्य विजेतेपद मिळविले आहे. इशांत सावंत याने ऑस्ट्रियातील ‘युरो लिटील चॅम्पियन’ स्पर्धेत पदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे. ही कामगिरी केवळ खेळाडूंच्या वैयक्तिक यशाची नोंद नाही; तर पुण्यातील प्रशिक्षण केंद्रांमधून दर्जेदार टेबल टेनिसपटू घडविण्याची प्रक्रिया योग्य दिशेने सुरू असल्याचेही अधोरेखित करते.
उद्याच्या चॅम्पियन्सकडे लक्ष
आज सीसीटीएमध्ये प्रशिक्षण घेणार्या अनेक उदयोन्मुख खेळाडूंकडून भविष्यातील मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत. नभ पंचोलिया, शगुन गेन्से, वृंदा महापडी, कार्तिकी नडे, एल्विस टॉम, अन्विता देशपांडे, निरजा देशमुख आणि शिवांश देशमुख हे खेळाडू आगामी काळात स्पर्धात्मक पातळीवर आपली छाप पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत. या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करण्याचे उद्दिष्ट अकादमीसमोर आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण सराव, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्पर्धांचा अनुभव यांना महत्त्व दिले जात आहे.
खरे यश केंद्रांच्या संख्येत नाही
राष्ट्रीय क्रीडादिन हा केवळ पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्याचा दिवस नाही; तर नव्या पिढीला खेळाकडे वळविण्याची आणि त्यांच्या क्रीडा प्रवासाला योग्य दिशा देण्याची संधी आहे. टेबल टेनिससारख्या खेळामुळे मुलांमध्ये एकाग्रता, संयम, निर्णयक्षमता आणि सातत्य निर्माण होते. हीच कौशल्ये शिक्षण आणि दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरतात. म्हणूनच लहान वयात मुलांना खेळाची गोडी लागणे आणि त्यांना योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. सीसीटीएच्या माध्यमातून काही उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
2019 मध्ये एका छोट्या प्रशिक्षण केंद्रापासून सुरू झालेला सीसीटीएचा प्रवास आज चार केंद्रांपर्यंत पोहोचला आहे. मात्र या प्रवासाचे खरे यश केंद्रांच्या संख्येत नाही, तर त्यातून घडलेल्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंच्या कामगिरीत आहे. टेबल टेनिसला पुण्यात अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देत, नव्या पिढीतील खेळाडूंच्या हातात रॅकेट आणि डोळ्यांसमोर चॅम्पियन होण्याचे स्वप्न देणारी सीसीटीएची वाटचाल भविष्यात पुणे आणि महाराष्ट्राला अधिकाधिक दर्जेदार टेबल टेनिसपटू देणारी ठरण्याची चिन्हे आहेत.






