पणजी :- गोव्यात सध्या सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 43 ऐवजी 42 खेळ असतील हा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेच्या तांत्रिक समितीकडून (जीटीसीसी) व्हॉलिबॉल-बीच व्हॉलिबॉलला वगळण्यात आले आहे. हॅंडबॉलसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या खेळाबाबतही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पर्धेचे चीफ द मिशन संदीप हेबळे यांनी सांगितले.
स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकाच्या यादीत न्यायालयीन प्रक्रियेत असलेला हॅंडबॉल आणि वाद असलेल्या स्क्वे मार्शल आर्ट या खेळांचाही समावेश नाही; पण हे दोन्ही खेळांचे राष्ट्रीय स्पर्धेत आयोजन होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा सध्या गोव्यात आहेत. व्हॉलिबॉल समावेशासंदर्भात गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी आयओएशी पत्रव्यवहार केला होता; मात्र आयओएला व्हॉलिबॉलबाबत संभाव्य खटला टाळायचा आहे. उषा यांनी व्हॉलिबॉलचा समावेश अशक्य असल्याचे आपल्याला सांगितले असून या घोषणा लवकरच अधिकृतपणे होईल, अशी माहितीही मिळत आहे.
हंगामी समितीही हतबल
देशातील व्हॉलिबॉलचा दैनंदीन कारभार पाहण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) नियुक्त केलेल्या हंगामी समितीही याबाबत हतबल ठरली आहे. केवळ या स्पर्धेसाठी पुरुष व महिला व्हॉलिबॉल संघ निवडणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या स्पर्धेसाठी पुरुष व महिला गटात प्रत्येकी आठ संघ निवडण्यासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध असल्याने यंदाच्या स्पर्धेत हा खेळ नसेल, असे समितीने म्हटले आहे.