National Games 2023 (Football) : महाराष्ट्राची लक्षवेधी कामगिरी; बलाढ्य केरळला बरोबरीत रोखले..

मडगाव : गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने फुटबॉलमध्ये गतउपविजेत्या बलाढ्य केरळला 2-2 असे बरोबरीत रोखून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ब-गटातील या सामन्यात 23व्या मिनिटाला केरळच्या मोहम्मद आशिकने पहिला गोल केला, तर 42व्या मिनिटाला निजोने पेनल्टीद्वारे दुसरा गोल केला. त्यामुळे केरळने पहिल्या सत्राच्या अखेरीस 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रातही सुमारे 32 मिनिटे गोल न झाल्यामुळे केरळ हा सामना आरामात जिंकणार अशी चिन्हे होती. पण महाराष्ट्राला हे नामंजूर होते.
82व्या मिनिटाला मनदीपने महाराष्ट्राचे गोलचे खाते उघडले. मग पाच मिनिटांनी (87वे मिनिट) यश शुक्लाने हेडरद्वारे प्रेक्षणीय गोल नोंदवत महाराष्ट्राला बरोबरीत नेले. त्यानंतरच्या खेळात केरळने आक्रमक खेळ करीत बरोबरीची कोंडी सोडवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केला. पण महाराष्ट्रानेही अप्रतिम प्रतिकार केला.
या सामन्यात महाराष्ट्राचा गोलरक्षक परमबीरला पहिल्या सत्रात दुखापत झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जागी कामरानने गोलरक्षणाची जबाबदारी सांभाळली.




