NADA test in 2023 : क्रिकेटपटू जडेजाची झाली सर्वाधिकवेळा डोपिंग चाचणी; नाडाने केला खुलासा..

नवी दिल्ली :- राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी सेवन समितीतर्फे (नाडा) देशभरातील खेळाडूंची(National Anti-Doping Agency Test) डोपिंग चाचणी करण्यात आली होती. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलु रवींद्र जडेजा याची सर्वात जास्त वेळा चाचणी झाल्याचे नाडाच्या अहवालात नमुद केले आहे. अर्थात, तो दोषी आढळलेला नसल्याचा खुलासाही नाडाने केला आहे.
यंदाच्या वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात जडेजासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांची या कालावधीत एकदाही चाचणी करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी मात्र या दोन्ही खेळाडूंची चाचणी करण्यात आली होती.
टी-20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याचीही एक चाचणी घेतली गेली होती. महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मानधनाची सर्वाधिक वेळा चाचणी घेतली गेली. यातील अनेक चाचण्या आयपीएल स्पर्धेदरम्यान घेतल्या गेल्या तर मानधनाची चाचणी एका आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर घेतली गेली. मात्र, या खेळाडूंनी बंदी असलेले कोणतेही द्रव्य सेवन केले नसल्याचेही नाडाने म्हटले आहे. आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंच्याही चाचण्या करण्यात आल्या होत्या, असेही नाडाने म्हटले आहे.
अन्य क्रीडापटूंच्याही झाल्या चाचण्या…
क्रिकेटपटूंसह अन्य खेळातील खेळाडूंच्याही चाचण्या करण्यात आल्या. त्यात वेटलिफ्टर मिराबाई चानू, महिला मुष्टियुद्ध खेळाडू लवलीना बोर्गोहेन, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग, पी. आर. श्रीजेश या खेळाडूंच्याही चाचण्या असून कोणीही दोषी आढळलेले नाही.





