नसरापूर : धनगर बांधवांचा जीवघेणा प्रवास; कचरे वस्तीतील पुलाच्या मागणीला केराची टोपली

नसरापूर – राजगड तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात वसलेल्या वेल्हे येथील घिसर गावाच्या हद्दीतील कचरे वस्तीतील ग्रामस्थांना कानंदी नदीवरील लाकडाच्या जुन्या साकवावरून जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
पावसाळा सुरू झाल्याने मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून, धनगर वस्त्यांना ये-जा करण्यासाठी पक्का पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना धोकादायक लाकडी पुलावरूनच नदी ओलांडावी लागते. लाकडी पूल कोसळण्याच्या अवस्थेत असून, तो कधीही तुटून नदीत कोसळू शकतो. अशा स्थितीत नागरिकांना जीव धोक्यात घालून रौद्ररूप धारण केलेल्या कानंदी नदीतून प्रवास करावा लागत आहे.
ग्रामस्थ रघुनाथ कचरे यांनी सांगितले की, “कित्येक वर्षांपासून लोखंडी पुलासाठी मागणी करतोय, मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देतात. प्रत्यक्षात काहीच होत नाही. पुलावरून शाळकरी मुले, गरोदर महिला, आजारी व्यक्तींना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कधी मोठा अपघात होईल, सांगता येत नाही.”
दोन दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातील वेगरे गावात अशीच घटना घडली. धनगर वस्तीतील कोंडिबा मरगळे हे नदी ओलांडताना पाण्यात वाहून जाऊन मृत्युमुखी पडले. अशा घटना वारंवार घडत असूनही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिकांची मागणी आहे की, लाकडाचा साकव तातडीने हटवून लोखंडी साकव उभारण्यात यावा. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील, अशी इशाराही त्यांनी दिला आहे.
मोठ्या दुर्घटनेच्या छायेत धनगर वस्ती
लोखंडी साकवाची मागणी करत असूनही मागणीची दखल घेतली जात नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून लोखंडी साकव उभारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





